कोल्हापूर : शहराच्या विकासासाठी स्वतः काही करायचे नाही आणि आम्ही केलेल्या कामांवर टीका करून आमची बदनामी करायची, हा एकच उद्योग विरोधक करत आहेत, अशा शब्दांत कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. हिंमत असेल तर विरोधकांनी समोरासमोर येऊन विकासकामांवर चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
शिवाजी पेठ येथील बलभीम बँक चौकात आयोजित ‘मिसळ पे चर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कुरडे, नगरसेवक उत्तम कोराणे, नगरसेवक महेश सावंत, शिवाजीराव जाधव, जिल्हा उपप्रमुख तुकाराम साळोखे, भाजपचे संग्राम जरग, प्रकाश सरनाईक, युवराज बचाटे, युवा सेना शैलेश साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, दोन वेळा आमदार असताना आणि 2019 मध्ये निवडणूक हरलो तरीही लोकांची कामे करणे थांबवले नाही. राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून शहरात पर्यायाने शिवाजी पेठ परिसरात विकासकामे केली. रंकाळा तलाव सुशोभीकरण, गांधी मैदानाचे सुशोभीकरण यासह इतर कामे केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माझी नाहक बदनामी केली. माझ्या विरोधात बोलण्यासारखे काही नसल्याने विरोधकांनी माझी बदनामी केली. यावेळीही त्यांचे तेच प्रयत्न सुरू आहेत. पण, शहरातील जनतेला मी केलेली विकासकामे दिसत आहेत. महाराष्ट्रात महायुतीला पोषक वातावरण आहे. यामुळे आपला विजय निश्चित आहे. शिवाजी पेठेला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील तलाव, मंदिरे, मैदाने याचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठीच पुढाकार घेऊन शिवाजी पेठ परिसराच्या विकासाचा मी ध्यास घेतला असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सध्या त्याचे कामही सुरू झाले. आगामी काळात शहरातील शंभर टक्के रस्ते सिमेंटचे करण्याचे नियोजन आहे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा काय केले, हे विरोधकांनी सांगावे. विरोधकांचा स्वतःचा विकास झाला, त्यांच्या शिक्षण संस्था मोठ्या झाल्या, त्यांचे दवाखाने मोठे झाले; पण शहराचे काय?, लोकांचे काय? विरोधकांनी समोरासमोर यावे आणि विकासकामांवर खुली चर्चा करावी. ते सांगतील तेथे, सांगतील त्या दिवशी आणि सांगतील त्यावेळी मी यायला तयार आहे, असे आव्हानही क्षीरसागर यांनी दिले.