कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी २२० कोटींचा आय.आर.बी.चा टोल माथी मारला. टोलची पावती फाडून कोल्हापूरकरांच्या लढ्याचा अवमान केला. त्यांच्यांवर ७५० कोटींची रक्कम ओवाळणी करून महायुती शासनाने कोल्हापूरवासीयांच्या मानगुटीवरचे टोलचे भूत गाडले. ते काय आमची हत्तीवरून मिरवणूक काढणार, असा टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
कोल्हापूर शहरात १०० कोटी निधीतून पूर्ण झालेल्या बेलबाग परिसरातील रस्त्यांची पाहणी आ. क्षीरसागर यांनी केली. यावेळी रस्त्यांच्या बाबतीत त्यांनी महापालिका अधिकारी व ठेकेदारास सूचना केल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आ. क्षीरसागर म्हणाले, ज्यांनी इतकी वर्षे राज्यात आणि महापालिकेत सत्ता भोगली त्यांनी शहरासाठी काय दिवे लावले? प्राथमिक सोयीसुविधाही ते कोल्हापूरला देऊ शकले नाहीत. परंतु, महायुती सरकार या सुविधा निर्माण करत आहे. निधी आणून रस्ते सुसज्ज केले; पण सत्ता गेल्याने विरोधकांचा जळफळाट होत आहे.
विरोधकांनी फक्त स्वत:चे कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल्स, संस्था मोठ्या केल्या. त्याउलट मी एकही संस्था काढली नाही की हॉटेल, कॉलेज बांधले नाही. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वत: थेट पाईपलाईनच्या पाण्याने अंघोळ केली. मात्र, त्या योजनेचा लाभ नागरिकांना होताना दिसत नाही.
शक्तिपीठ महामार्ग सतेज पाटील यांच्या घरावरून जातोय काय?
आ. क्षीरसागर म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग आमदार सतेज पाटील यांच्या घरावरून जातोय काय? मला वाटत नाही त्यांच्या घरावरून जात असेल. त्यामुळे त्यांनी फक्त राजकीय विरोधासाठीच शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे.