दिलीप भिसे
कोल्हापूर : मुंबईसह गोवा, बिहार, मध्य प्रदेश तसेच राजस्थानातील कुख्यात ड्रग्ज तस्करांनी कोल्हापूर, सांगलीसह सातारा, सोलापूर व पुणे ग्रामीण क्षेत्रात अक्षरश: बाजार मांडला आहे. कोकेन, चरस, मेफेड्रोन, अफू, गांजासह नशिल्या गोळ्यांची बेधडक तस्करी सुरू केली आहे. जानेवारी-डिसेंबर 2025 तसेच जानेवारी ते मार्च 2026 या 15 महिन्यांच्या काळात कोल्हापूर परिक्षेत्रात 674 तस्करांना बेड्या ठोकून पोलिसांनी 70 कोटींचा ड्रग्जसाठा हस्तगत केला आहे. नशिल्या धुंदीमुळे तरुणाईची होणारी बरबादी लक्षात घेता ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे खणून काढण्याची आवश्यकता आहे.
झटपट आणि मुबलक कमाई देणार्या तस्करीत 17 ते 22 वयोगटातील कोवळी पोरंही गुरफटू लागल्याने तस्करीची दुकानदारी मोठ्या प्रमाणात फोफावू लागली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरसह पुणे ग्रामीण क्षेत्रात सराईत गुन्हेगारांना कमिशनचे आमिष दाखवून तस्करीच्या जाळ्यात ओढले जाऊ लागले आहे. आंतरराज्य कुख्यात माफियांकडून मिळणारी मुबलक रसद, आश्रयामुळे शहरासह ग्रामीण भागात ड्रग्ज तस्करीचा फंडा जोमाने सुरू झाल्याचे चित्र आहे.
गतवर्षी 2025 तसेच जानेवारी-मार्च 2026 काळात कोल्हापूर परिक्षेत्रात ड्रग्ज तस्करीप्रकरणी एकूण 925 गुन्हे दाखल झाले. त्यात ड्रग्ज सेवन (659), ड्रग्ज कब्जात बाळगणे (236), जेरबंद संशयित (674), 40 ठिकाणी छापे टाकून तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातून 2025 मध्ये 42 कोटी 89 लाख, तर जानेवारी ते मार्च 2026 या काळात 25 कोटी 11 लाखांचा ड्रग्जसाठा हस्तगत करण्यात आला आहे. सव्वा वर्षात झालेल्या कारवाईवरून ड्रग्ज तस्करीच्या उलाढालीचा अंदाज येऊ शकतो.
कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रात ड्रग्जचा मुबलक साठा
2025 मध्ये परिक्षेत्रांतर्गत गांजा (2 हजार 593.232 ग्रॅम), चरस (81 ग्रॅम), अफू (1,380.99 ग्रॅम), एमडी ड्रग्ज (16.196 किलोगॅ्रम), नशागोळी (2,718 नग), हशिश (118 ग्रॅम) जानेवारी ते मार्चअखेर गांजा (877.37 किलो), अफू झाडे (47.261 किलो), एम.डी. ड्रग्ज (215 ग्रॅम 356 मि.लि.), अल्प्राझोलम (10 किलो 707 ग्रॅम), बंटा गोळी (205.778 ग्रॅम).