कोल्हापूर

राजर्षी शाहू छत्रपती महाराज स्मृती शताब्दी सांगता विशेष : ‘कला- क्रीडा’ला राजाश्रय

मोहन कारंडे

राजर्षी शाहू महाराजांचे सांस्कृतिक व कला-क्रीडाविषयक धोरण समजून घेणे हे आजच्या काळातही उपयुक्त आहे. संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला अशा ललितकलांना महाराजांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूर हे खर्‍या अर्थाने 'कलापूर' बनले होते. तसेच 'मल्लविद्येचे माहेरघर' म्हणून देशभर ओळखले जाऊ लागले.

राजर्षी शाहू महाराज एक लोककल्याणकारी व द्रष्टे राज्यकर्ते होते. मागासवर्गांच्या उन्नतीचा आपला महत्त्वपूर्ण कृती कार्यक्रम निर्धारपूर्वक राबवत असतानाच त्यांनी साहित्य, कला, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अग्रक्रमाने राबविले. गुणी खेळाडू, कलावंतांचा शोध घेऊन व त्यांना राजाश्रय देऊन इतिहास घडविणारी एक पिढी त्यांनी निर्माण केली. त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूर हे खर्‍या अर्थाने 'कलापूर' बनले होते. तसेच 'मल्लविद्येचे माहेरघर' म्हणून देशभर ओळखले जात होते. कोल्हापूरसारख्या एका छोट्या संस्थानाचा संस्थानिक देशभरातील कलावंत, पैलवान, खेळाडू वगैरेंच्या गळ्यातील ताईत होतो, त्यांचा प्रमुख आश्रयदाता, मार्गदर्शक व प्रेरणास्रोत बनतो, यावरून शाहू महाराजांची सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील भारतीय पातळीवरील अद्वितीय कामगिरी लक्षात येते.

संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला अशा ललितकलांना महाराजांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या भरघोस मदतीने 'देवल क्लब'सारखी संगीतास वाहिलेली संस्था भारतीय कीर्तीची बनली. देशातील विविध संगीत घराण्यांच्या गायकांची घडण करवीर नगरीत झाली. गानमहर्षी अल्लादियाखाँ व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला राजाश्रय देऊन करवीर संस्थानात जणू संगीत विद्यापीठच स्थापन केले. पं. भास्करबुखा बखले, हैदरखाँ, मंजीखाँ, केसरबाई केरकर, गोविंदबुवा शाळीग्राम अशा भारतीय पातळीवर ख्यातकीर्त पावलेल्या कलावंतांनी एक प्रकारे 'कोल्हापूर घराणे'च निर्माण केले. देवासचे सुप्रसिद्ध गवई रजब अलीखाँ, किराणा घराण्याचे अध्वर्यू हैदरबक्षखाँ, अब्दुल करीमखाँ, अंजनीबाई मालपेकर, गानचंद्रिका लक्ष्मीबाई जाधव अशा अनेक गायकांनी भारतीय संगीतक्षेत्रात आपले नाव अजरामर केले. शाहू महाराजांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने, राजाश्रयाने शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात महान कलावंत उदयास आले. ही एक प्रकारे महाराजांची शास्त्रीय संगीतास अमूल्य देणगीच आहे.

महाराजांनी शास्त्रीय संगीताबरोबरच, भजन, शाहिरी, जलसे वगैरेंनाही उदारहस्ते प्रोत्साहन दिले. कलगी व तुरेवाले शाहिरांचे फड व त्यांच्या सवाल-जवाबांनी रसिकांच्या मनाबरोबरच बुद्धीलाही वेड लावले. सत्यशोधक शाहीर विठ्ठल डोणे, लहरी हैदर, रामचंद्र माळी, ईश्वरा माळी अशा अनेक शाहिरांनी कोल्हापुरी बाणा महाराष्ट्रभर घुमविला. 'जो निद्रित महाराष्ट्राला। जागे करण्याला। ज्ञान रवि झाला। शाहू छत्रपती सत्य आधार॥ मानवी जाणविले अधिकार। म्हणून प्रभू शाहू देव अवतार॥' असा शाहूगौरव शाहीर लहरी हैदर यांनी केला आहे. याच शाहिरी परंपरेत पुढे शाहीरविशारद पिराजीराव सरनाईक, भाऊसाहेब पाटील, श्रीपतराव लोखंडे, राजू राऊत असे दिग्गज शाहीर निर्माण झाले.

चित्रकलेच्या क्षेत्रात कोल्हापूरने जी उत्तुंग भरारी मारली आहे, तिचा पाया शाहूराजांनीच घातला. सत्यशोधक जलशांचे मेळे भरवून समाजप्रबोधनाचे चक्र गतिमान केले. जलसाकारांना अर्थसहाय्य करून वेळप्रसंगी त्यांच्या पाठीशी महाराज पहाडासारखे भक्कम उभे राहिले. त्यामुळेच सत्यशोधक चळवळीचा झंझावात महाराष्ट्रातही निर्माण झाला.

कोटीतीर्थाच्या निसर्गरम्य परिसरात राहणार्‍या आबालाल रहिमान या तरुण तपस्वी कलावंताची कीर्ती कानांवर येताच महाराजांनी त्यांना खास पाचारण करून 'दरबार-चित्रकार' असा हुद्दा व तरखा देऊन गौरव केला. कलावंतांची सर्जनशील प्रतिभा व लहर कशी सांभाळावी, याचा आदर्श वस्तुपाठ महाराजांनी घालून दिला. आबालाल रहिमान यांनी सुमारे 15 ते 20 हजारांवर चित्रे काढली, आज त्यांतील फारच थोडी शिल्लक राहिली आहेत. जवळपास एका पिढीने करावे एवढे काम त्यांनी एकट्याने केले. रसिकांची शुद्ध हरपून टाकणारा जागतिक दर्जाचा हा महान चित्रकार होता.

आनंदराव व बाबूराव या पेंटर बंधूंची कलात्मक घडण शाहू काळातीलच. अत्यंत कल्पक, बुद्धिमान व जिद्दीच्या या कलावंतांनी चित्रकलेच्या क्षेत्रात आपल्या शैलीचे स्वतंत्र 'स्कूल'च निर्माण केले. बाबा गजबर, दत्तोबा दळवी, माधवराव बागल यांना शाहू महाराजांचे प्रत्यक्ष प्रोत्साहन व सहाय्य लाभले. दत्तोबांनी पुढे 'दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट' ही चित्रकला शिक्षण संस्था स्थापन केली. महाराजांनंतर कोल्हापुरात चित्र-शिल्पकलेची अत्यंत समृद्ध परंपरा निर्माण झाली. शशिकिशोर चव्हाण, जी. कांबळे, रवींद्र मेस्त्री, बाबूराव सडवेलकर, पी. सरदार, जयसिंगराव दळवी, शामकांत जाधव आदी कलावंतांनी कोल्हापूरची चित्र-शिल्प कलापरंपरा समृद्ध करीत भारतीय पातळीवर स्वतंत्र ठसा उमटविला आहे.

शाहू महाराजांच्या कारकिर्दीत नाट्यकलेतही वैभवाचे दिवस आले. केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांच्यासारखे महान कलावंत करवीरनगरीने मराठी रंगभूमीस दिले. दत्तोपंत हल्याळकर, दत्तोपंत भोसले, गोविंदराव टेंबे, शंकरराव सरनाईक असे अनेक कलावंत, नाटक कंपन्या, त्यांचे प्रयोग यांना महाराजांनी सदोदित प्रोत्साहन दिले. नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी पॅलेस थिएटर (सध्याचे केशवराव भोसले नाट्यगृह) त्यांनी बांधले. तमाशासारख्या ग्रामीण, रांगड्या लोककलेला आश्रय देऊन लोकरंजनाबरोबरच लोककलावंताचे जतन-संवर्धन केले.

कोल्हापूरला 'मल्लविद्येची पंढरी', 'कुस्तीचे माहेरघर' बनविण्याचे सारे श्रेय शाहू महाराजांना जाते. त्यांनी तालमीच्या स्थापनेस व वाढीस प्रोत्साहन दिले. गुणवंत मल्ल हेरून त्यांच्या तालमीची व खुराकाची व्यवस्था केली. कुस्त्यांची मैदाने भरवून व भरघोस बक्षिसे आणि पितृवत प्रेम देऊन पैलवानांना व कुस्तीला सोन्याचे दिवस आणले. 'खासबाग मैदाना'चे बांधकाम करून अखिल भारतीय पातळीवरील मल्लांना कोल्हापूरला आमंत्रित केले. पंजाब, दिल्ली आणि उत्तर भारतातील मल्ल कोल्हापूरकडे येऊ लागले. कोल्हापूर हे त्या काळात भारतातील 'मल्लविद्येचे विद्यापीठ' बनले. महाराजांच्या उदार राजाश्रयाने कोल्हापुरात बुलंद मल्लांची एक पिढीच उदयास आली. कुस्तीबरोबरच महाराजांनी मर्दानी खेळांनाही प्रोत्साहन दिले.

– डॉ. अरुण शिंदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT