कोल्हापूर : प्रामाणिकपणे आणि चांगले काम करत राहा. लोक तुमचा सन्मान करतील. चांगल्या कामाचा समाज नेहमीच आदर करत असतो. राजर्षी शाहूंच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या राजर्षी शाहू पुरस्काराचे वितरण आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. शासकीय विश्रामधाम येथील शाहू सभागृहात खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे करता येतात. परंतु, आपल्याकडे काम करण्यापेक्षा अडविण्यातच लोकांना अधिक रस असतो. पदामुळे नव्हे, तर व्यक्ती करत असलेले काम त्याला मोठेपण मिळवून देते. मिळालेल्या संधीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करा. पुरस्कार गुणवत्तेवरच द्या, असेही ते म्हणाले. पुढील वर्षीपासून पत्रकारांना देण्यात येणारी पुरस्काराची रक्कम तालुका स्तरावर 10 हजार व जिल्हा स्तरावर 25 हजार करा. 50 हजार लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या दि. 26 जानेवारीला देऊन त्यांचे स्वप्न साकार करा, असेही त्यांनी सांगितले.
खा. शाहू महाराज यांनी छत्रपती शाहूंच्या नावच्या पुरस्काराने काम करण्यास बळ मिळेल, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्वागत केले. याप्रसंगी ई-सेवा पुस्तक, पशुधनातील लिंग निर्धारीत रेतन मात्रा पुरवठा व भविष्य निर्वाह निधी संगणक प्रणाली या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमाले येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, मानसिंग पाटील, डॉ. प्रमोद बाबर आदी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले.
जिल्ह्याला 60 हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 50 हजार घरकुले जानेवारीपर्यंत पूर्ण करायची आहेत. यासाठी काही सांगायचे नाही, आम्हाला वाळू फुकट उपलब्ध करून दिलीच पाहिजे, असे आबिटकर यांनी जिल्हाधिकार्यांना सांगितले.
2005 मध्ये शाहू पुरस्कार मिळाला होता, आजच्या पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने त्याची आठवण झाल्याचे सांगत दि. 26 जुलै 2005 रोजी महापूर होता. रस्ते बंद झाले होते तरीही मार्ग काढत आलो होता, असे सांगताना पालकमंत्री भावुक झाले.