कोल्हापूर

राजाराम कारखाना निवडणूक : ऑनलाईन आव्हान ते प्रत्यक्ष मैदान

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा टोकदार संघर्ष जिल्ह्याला पाहायला मिळत आहे. याच संघर्षातून परस्परांना ऑनलाईन आव्हान देण्यात आले. या आव्हानाने एवढे टोक गाठले की, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुरू असलेला संघर्ष थेट बिंदू चौकात उतरला आणि पाटील-महाडिक संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला. उपस्थितीचा अल्टिमेटम जवळ येईल तसतसा तणाव वाढत होता. नेते येण्यापूर्वीच दोन्ही बाजूचे हजारो कार्यकर्ते बिंदू चौकात जमल्याने हा पॉलिटिकल ड्रामा हायव्होल्टेज झाला.

गेली काही वर्षे सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष जिल्हा पाहत आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महापालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती ही सर्व सत्तास्थाने या संघर्षात महाडिक यांच्या हातातून निसटली. मात्र, 'गोकुळ' हा जिल्ह्याच्या राजकारणातील बलाढ्य आर्थिक गड महाडिक यांच्याच ताब्यात राहिला. त्याही गडाला सुरुंग लावण्यात विरोधकांना यश आले. सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी 'गोकुळ'वर ताबा मिळवला आणि महाडिक यांच्याकडील मोठे सत्तास्थान संपुष्टात आले. आता महाडिक यांच्याकडे केवळ राजाराम कारखान्यातील सत्ता आहे.

राजाराम कारखान्यातील सत्ता टिकवण्यासाठी महाडिक यांना संघर्ष करावा लागत आहे; तर महाडिक यांचे उरलेसुरले सत्तास्थानही खालसा करण्यासाठी सतेज पाटील यांनी टोकाचा संघर्ष पुकारला आहे. यातूनच महाडिक भ्याले अशी टॅगलाईन पाटील गटाने पुढे आणली आणि ती सर्वत्र पोहोचवली. आपण घाबरलो, असे चित्र जाता कामा नये यासाठी महाडिक यांना प्रतिचाल रचण्याची गरज होती. त्यातूनच आम्ही घाबरत नाही आम्ही महाडिक आहोत. हे मतदारांवर बिंबवण्यासाठी बिंदू चौकात येण्याचे आव्हान महाडिक गटाने पाटील यांना दिले.

तोवर आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा होणारच

मुळात बिंदू चौक हा संवेदनशील भाग. तेथे जायचे की नाही, असा खल सुरू झाला. मात्र, एकदा आव्हान दिले तर ते स्वीकारलेच पाहिजे. या भावनेतून पाटील गटानेही तोडीस तोड प्रतिआव्हाने देण्याची तयारी केली. अमल महाडिक, आमदार ऋतुराज पाटील बिंदू चौकात आले. घोषणाबाजी झाली. दोघांनीही आपल्या भूमिका मांडल्या आणि आव्हान-प्रतिआव्हानाला अर्धविराम मिळाला. आता कारखान्यासाठी मतदान हाच या संघर्षाला पूर्णविराम असेल. तोवर आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा होणारच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT