मुदाळतिट्टा: परिसरात पावसाचा जोर ओसरला असून वेदगंगा नदीची पाणीपातळीही घटत आहे. मात्र, हा दिलासा मिळूनही राधानगरी-निपाणी या प्रमुख राज्यमार्गावरील वाहतूक अद्याप ठप्प आहे. मुरगुडजवळील निढोरी येथे स्मशानभूमीजवळ रस्त्यावर अजूनही दोन फूट पाणी साचल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र, आता पावसाने उसंत घेतल्याने नदीची पातळी सुमारे तीन फुटांनी कमी झाली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास गुरुवारी सायंकाळपर्यंत निपाणीकडे जाणारा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिंदेवाडी-यमगे मार्ग: या मार्गावरील पाणी पूर्णपणे ओसरले असून, तेथील वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे.
मुरगूड-कापसी मार्ग: मुरगूड येथील ऐतिहासिक सर पिराजी तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग अद्याप बंदच ठेवण्यात आला आहे.
गेले दोन दिवस शहराला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढा घातल्याने आणि रस्ते बंद झाल्याने मुरगुडमधील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात घटली होती. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले होते. पावसाने उसंत घेतली असली तरी पुराचे पाणी पूर्णपणे ओसरून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.