कोल्हापूर : उघडिपीनंतर सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. सात धरणक्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसाबरोबरच नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ सुरू झाली. पंचगंगेची कमी होत चाललेली पाणी पातळी सकाळी 11 नंतर पुन्हा वाढू लागली आहे. दिवसभरात पाणी पातळीत दोन फुटाने पुन्हा वाढ झाली.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पाणी पातळी कमी होत गेली. रविवारी 26 फुटांवर असलेली पाणी पातळी सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 24.7 फुटांपर्यंत कमी झाली होती. दरम्यान, रविवारी रात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. यानंतर सोमवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत राहिल्या.
शहरासह जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्याने नंद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरू झाली. सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरू झाली. 24.7 फुटांवर असणारी पाणी पातळी रात्री 10 वाजता 26.7 फुटांवर गेली. पाणी पातळीत वाढ सुरू झाल्याने पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सात धरणक्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली. धरणांच्या पाणी पातळीतही वाढ होत असून, जिल्ह्यातील 17 पैकी 10 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी 61 टक्के भरले आहे. धरणात 5.14 टीएमसी पाणीसाठा झाला असून, 3100 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. वारणा 58 टक्के भरले आहेत, त्यातून 1720 क्यूसेक, दुधगंगा 34 टक्के भरले असून, त्यातून 1400 क्यूसेस, तुळशी 55 टक्के भरले असून त्यातून 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाटगाव धरणही 61 टक्के भरले आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 13.9 मि.मी.पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 44.2 मि.मी.इतका झाला. पन्हाळ्यात 23.2 मि.मी., शाहूवाडीत 22.3 मि.मी.पावसाची नोंद झाली.