रेल्वे विकासाला ‘खो’; लोकप्रतिनिधींची अनास्था Pudhari File Photo
कोल्हापूर

रेल्वे विकासाला ‘खो’; लोकप्रतिनिधींची अनास्था

स्थानकातून नव्या नाहीच; सुरू असलेल्या चार गाड्या बंद

पुढारी वृत्तसेवा
अनिल देशमुख

दि. 21 एप्रिल 1891 रोजी कोल्हापूर-मिरज हा रेल्वेमार्ग सुरू झाला. छत्रपती शाहूंच्या दूरद़ृष्टीतून उभारलेल्या या रेल्वेमार्गामुळे कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले. आज दि. 21 एप्रिल रोजी या मार्गाला 134 वर्षे पूर्ण होत आहेत. गेली 134 वर्षे कोल्हापूरच्या विकासात मोठे योगदान देणार्‍या कोल्हापूरची रेल्वे मात्र इतक्या वर्षांत कधी विकासाच्या रुळावरून वेगाने धावली नाही. रेल्वे विकासासाठी राजकीय ताकद कमी पडली काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, त्याचा आढावा घेणारी वृत्तमालिका....

कोल्हापूर : कोल्हापूरचे आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याच्या संपत्तीचे साधने वाढण्याच्या कामी याचा फायदेशीर परिणाम होईल,’ विकासाची प्रचंड दूरदृष्टी असलेल्या, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दि. 3 मे 1888 रोजी काढलेले हे उद्गार, आज कोल्हापूरच्या द़ृष्टीने ते सत्यात उतरताना दिसत असले, तरी राजर्षी शाहू महाराज यांच्या नंतर लोकप्रतिनिधींकडून रेल्वेचा म्हणावा तसा विकासाचा प्रयत्न झालाच नाही. यामुळे गेल्या 134 वर्षांत नव्या रेल्वे सोडाच, सुरू असणार्‍या चार एक्स्प्रेस बंद झाल्या.

कोल्हापूर स्थानकातून सध्या 6 एक्स्प्रेस दररोज, एक एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळा, एक एक्स्प्रेस आठवड्यातून दोन वेळा, तर तीन एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा धावतात. यासह पाच पँसेजर दररोज धावतात. कोल्हापूरचे भौगोलिक, धार्मिक, व्यापारी, औद्योगिक आणि पर्यटनद़ृष्ट्या असलेले महत्त्व पाहता कोल्हापूर थेट रेल्वेमार्गाने देशातील महत्त्वांच्या शहराशी जोडले जाणे आवश्यक आहे. यामुळे दररोज या स्थानकातून सुटणार्‍या एक्स्प्रेस रेल्वेगाड्याची संख्या 134 वर्षांत किमान 15 पेक्षा अधिक असायला हवी होती.कोल्हापुरातून नव्या गाड्या सोडाव्यात, अशी सातत्याने मागणी होते. दरवेळी निवेदने दिली जातात. विविध बैठकांत या मागण्या केल्या जातात. मात्र, नव्या गाड्या सोडाच, उलट ज्या गाड्या सुरू होत्या, त्यापैकी चार गाड्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या.

कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर दररोज धावणारी गाडी पुढे मणुगुरूपर्यंत वाढवण्यात आली होती. कोल्हापूर-सोलापूर या मार्गावर धावणार्‍या गाडीला, तर सुपरफास्टचा दर्जा देण्यात आला होता. कोल्हापूर-बंगळूर राणी चेन्नमा एक्स्प्रेस दररोज धावत होती. कोल्हापूर-बिदर मार्गावरही आठवड्यातून एकदा धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस होती. या सर्व गाड्या रेल्वेने बंद केल्या. कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्स्प्रेसही बंद केली. लोकांनी रेटा उभारल्यानंतर ती पुण्यापर्यंत का होईना सुरू ठेवली आहे. या कालावधीत कोल्हापूर-पुणे वंदे भारत आणि कलबुर्गी-कोल्हापूर या दोन नव्या गाड्यांचा समावेश झाला आहे; मात्र कलबुर्गी ही गाडी सोलापूर विभागाने सुरू केली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत आठवड्यातून केवळ तीनच दिवस धावणारी कोल्हापूर-पुणे वंदे भारत वगळता नवी गाडी सुरू झालेली नाही. (क्रमश:)

या गाड्या झाल्या बंद

कोल्हापूर-सोलापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस

कोल्हापूर-मणुगुरू एक्स्प्रेस

कोल्हापूर-बंगळूर राणी चेन्नमा एक्स्प्रेस

(आता मिरज-बंगळूर)

कोल्हापूर-बिदर एक्स्प्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT