हुपरी : हुपरी-रेंदाळ येथील अंबाबाईनगर वसाहतीतील एका गोडावूनमध्ये सुरू असणार्या बनावट देशी दारू तयार करणार्या अड्ड्यावर एक्साईज विभागाने छापा टाकून विविध कंपन्यांचे स्टीकर लावण्यात आलेले बनावट देशी दारूचे बॉक्स, दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, दोन वाहने, मोबाईलसह 25 लाख 40 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
या छाप्याची व्याप्ती मोठी असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हाप्रमुखांसह जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी दिवसभर ठाण मांडून होते. याप्रकरणी गोडावून मालक वसंत धनाजीराव पाटील (वय 50, रा. अंबाबाई मंदिरनजीक, हुपरी) याला ताब्यात घेतले आहे. एक्स्पायरी (मुदत संपलेली) झालेली देशी दारू एकत्रित करून त्यामध्ये स्पिरीट मिसळून विविध ब्रँडच्या नावे पुन्हा बाटलीमध्ये पॅकिंग करून ही दारू नव्याने बाजारात आणण्याचा उद्योग बिनबोभाट सुरू होता. हा उद्योग रेंदाळ-हुपरी हद्दीतील अंबाबाईनगर वसाहतीतील हॉटेल गारवाच्या पाठीमागील बाजूस असणार्या वसंत पाटील याच्या गोडावूनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अगदी बिनधास्तपणे सुरू होता.
अज्ञाताने याबाबतची माहिती एक्साईज विभागाला कळविली होती. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या अड्ड्यावर उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकला. यावेळी त्यांना एक्स्पायरी झालेल्या विविध ब्रँडच्या देशी दारूचे बॉक्स, स्पिरीटचे बॅरल, विविध ब्रँडच्या स्टीकर लावलेल्या मोकळ्या बाटल्या, असा मोठा साठा आढळून आला. तसेच, वसंत पाटील याच्या गंगानगर वसाहतीतील गोडावूनमध्ये स्पिरीटचे बॅरल व मिलिंद हौसिंग सोसायटीनजीकच्या देशी दारू दुकानात बनावट दारू व स्पिरीट आढळून आले. या कारवाईत बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट व इतर मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त करण्यात आले असून, गोडावून मालक वसंत पाटील याला ताब्यात घेतले आहे.