कोल्हापूर : राष्ट्रवादीत काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा मुहूर्त अखेर ठरला. दि. 25 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सडोली खालसा (ता. करवीर) येथे राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित असतील. आपण महायुतीचा घटक होणार असलो, तरी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत नरके यांच्या विरोधात आपली उमेदवारी असणारच, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी राजेश पाटील उपस्थित होते.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राहुल पाटील म्हणाले, वडील पी. एन. पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी बळ दिले. त्यातून विधानसभा निवडणूक लढविली. यामध्ये निसटता पराभव झाला. त्यानंतर समोर आलेल्या अनेक राजकीय तसेच सहकारातील आव्हानांमुळे पी. एन. पाटील यांच्या पाठीशी असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते.
पी. एन. पाटील पराभूत झाले होते; पण त्यांच्या पाठीशी विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते होते. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना त्याची फारशी झळ बसली नाही. सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राजकारणाचे रंगही बदलले आहेत. अशावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना वेगळ्या वाटेवरून जाण्यासंदर्भातील सूचना अनेकांकडून आल्या. त्यामुळे वेगवेगळे पर्याय तपासून पाहण्यात आले. त्यातून सामूदायिकरीत्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपण भाजपच्या कोणत्याही नेत्यांना भेटलो नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगून पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत खूप मदत केली. आपली कोणाबद्दलच काही तक्रार नाही. आगामी 2029 ची निवडणूक आपण लढविणार असल्याचे पवार यांना सांगितले आहे. त्यांनी ठामपणे पाठीशी राहण्याचा शब्द दिला आहे. राष्ट्रवादी प्रवेशासाठी केवळ साखर कारखानाच नाही, तर कार्यकर्त्यांच्या भावनादेखील महत्त्वाच्या आहेत.
राजेश पाटील यांच्यासह आपण आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यांनी पक्षातून जाऊ नये, अशी विनंती केली; परंतु कामे होत नसतील, तर त्या पक्षात राहून काही उपयोग नाही, असे कार्यकर्त्यांचे मत पडले. त्यामुळे आपण काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असे पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांत पी. एन. पाटील गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.