Rahul Patil joins Ajit Pawar Pudhari News
कोल्हापूर

Kolhapur politics: कोल्हापूरात काँग्रेसला मोठा धक्का; पी. एन. पाटलांच्या निष्ठेचा वारसा खंडित, राहुल पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Rahul Patil joins Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत 'देवगिरी'वर अंतिम चर्चा; ऑगस्ट अखेर करवीरमध्ये भव्य शक्तिप्रदर्शनाने करणार पक्षप्रवेश

पुढारी वृत्तसेवा

राशिवडे: काँग्रेसचे निष्ठावंत नेते, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा राजकीय वारसा सांभाळणारे त्यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी अखेर काँग्रेसचा 'हात' सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेश निश्चित झाला असून, बुधवारी (दि.३०) त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 'देवगिरी' बंगल्यावर भेट घेऊन पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करवीर विधानसभा मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन करत हा पक्षप्रवेश होणार आहे.

अखेर चर्चांना पूर्णविराम

दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या हयातीतच त्यांच्या भाजप किंवा राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या निधनानंतर राहुल पाटील यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल पाटील यांना बारामती येथे भेटीचे निमंत्रण दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर, आपल्या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले होते.

शिलेदारांशी चर्चा करूनच निर्णय

त्यानुसार, त्यांनी गेल्या काही दिवसांत करवीर मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तसेच, भोगावती साखर कारखान्याचे संचालक आणि पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक असलेल्या शिलेदारांशी चर्चा करून त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतला.

'देवगिरी'वर प्रवेशावर शिक्कामोर्तब

बुधवारी (दि.३०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला राहुल पाटील यांच्यासोबत त्यांचे प्रमुख समर्थक उपस्थित होते. यामध्ये जिल्हा बॅकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर, गोकुळचे संचालक बाळासो खाडे, भोगावतीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे, सत्यजित पाटील, भोगावतीचे संचालक ए.डी.चौगले, बाजार समितीचे माजी सभापती भैय्या भुयेकर, बी.एच.पाटील, गणेश आडनाईक, चेतन पाटील नेते होते.

कोल्हापूरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार

राहुल पाटील यांच्या या निर्णयामुळे करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात असून, अजित पवार गटाची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात आणखी वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT