गुडाळ : पी. एन. पाटील यांचे चिरंजीव जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि केडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या कथित भाजप प्रवेशाची शक्यता मावळली असतानाच नुकतीच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवार यांनी पाटील बंधूंना समर्थकासह राष्ट्रवादीमध्ये सक्रिय व्हावे, अशी खुली ऑफर दिली आहे. त्याला राहुल पाटील यांनीही दुजोरा दिला.
काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून पी. एन. पाटील यांचा करवीर तालुक्यात मोठा गट आहे. तसेच राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यात या गटाला मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. भोगावती सहकारी साखर कारखान्यावर या गटाची अनेक वर्षे सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांना अवघ्या एक हजार 976 मतांनी पराभव पत्करावा लागला.
40 वर्षे निष्ठा ठेवूनही दिवंगत पाटील यांचा काँग्रेस पक्षाकडून योग्य सन्मान झाला नाही, याची कार्यकर्त्यांना खंत आहे. पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर वरिष्ठांकडून दखल घेतली नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. पाटील गटाच्या ताब्यातील भोगावती साखर कारखाना गेल्या काही वर्षात आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहे. त्यामुळे पाटील बंधूंनी राज्यातील सत्ताधारी गटात प्रवेश करावा, असा काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यातूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली; मात्र कार्यकर्त्यानी भाजप प्रवेशाला पसंती न दिल्याने हा विषय मागे पडला.
केडीसीसी बँक, बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ, भोगावती साखर कारखाना आदी संस्थांमध्ये हसन मुश्रीफ यांच्याबरोबर पाटील गट आघाडीत आहे. करवीरमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. त्यामुळे पाटील गटाला राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणे सोयीचे राहील. तसेच गोकुळच्या सत्तेत पाटील गटाचे पुनरागमन होऊ शकते. सध्या पाटील गट काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील यांच्या सोबत आहे. आ. पाटील यांची करवीर आणि गगनबावडा तालुक्यात स्वतंत्र वोट बँक आहे. राष्ट्रवादी प्रवेशावेळी पाटील गटाला हा मुद्दाही दुर्लक्षून चालणार नाही.
राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, भोगावतीसाठी एनसीडीसीच्या अर्थसाह्याबाबत मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोबत येण्याची खुली ऑफर दिल्याचे सांगितले.