PN group split Kolhapur politics Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Politics: राहुल पाटलांच्या पक्षांतराने पी. एन. गटात उभी फूट; सतेज पाटलांकडून 'डॅमेज कंट्रोल' सुरू, राधानगरीतील नाराज कार्यकर्त्यांची आज बैठक

PN group split Kolhapur politics: राहुल पाटील यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय पी. एन. पाटील गटातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना मान्य नसल्याने नाराज कार्यकर्त्यांची आज (दि.३१) कोल्हापुरात महत्त्वपूर्ण बैठक

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ: जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याची भूमिका स्पष्ट करताच, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषतः राधानगरी तालुक्यात, मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांचे वडील, दिवंगत नेते पी. एन. पाटील यांच्या निष्ठावंत गटात उभी फूट पडली असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी संभाव्य राजकीय नुकसान टाळण्यासाठी 'डॅमेज कंट्रोल' सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून, राहुल पाटील यांच्या निर्णयावर नाराज असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज (दि.३१) कोल्हापुरात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.

कोण कोण काँग्रेससोबतच राहणार?

राहुल पाटील यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय पी. एन. पाटील गटातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना मान्य नाही. हे कार्यकर्ते काँग्रेसमध्येच राहण्यास इच्छुक असून, ते आज (दि.३१) आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या नाराज कार्यकर्त्यांमध्ये भोगावती साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन संजयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग भांदिगरे, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे, काँग्रेसचे तालुका समन्वयक सुशील पाटील (कौलवकर) अशोकराव साळोखे, ज्ञानदेव पाटील, रमेश पाटील, संजय माळकर अशा स्थानिक प्रमुख नेत्याच्या नावांचा देखील समावेश आहे. यांच्यासह भोगावती कारखान्याचे काही वजनदार माजी संचालकही राहुल पाटील यांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

राधानगरीतील राजकीय समीकरणे बदलणार?

राधानगरी तालुक्यात काँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच पी. एन. पाटील गट आणि सतेज पाटील गट असे दोन प्रवाह कार्यरत आहेत. भोगावती काठावर पी. एन. गटाचे वर्चस्व राहिले आहे, तर उर्वरित तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सतेज पाटील गटात भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, गोकुळचे संचालक आर. के. मोरे, बिद्रीचे संचालक डी. एस. पाटील, बाजीराव चौगले, वैभव तशिलदार, संदीप डवर यांसारखे नेते आधीपासूनच सक्रिय आहेत. आता पी. एन. गटातील ही नाराज मंडळी सतेज पाटील गटात सामील झाल्यास, राधानगरी तालुक्यात काँग्रेसचे अस्तित्व पुन्हा एकदा मजबूत होण्याची चिन्हे आहेत.

बैठकीची रणनीती ठरली

जिल्हा काँग्रेसचे राधानगरीतील निरीक्षक, माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांनी या नाराज कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधून त्यांना कोल्हापुरातील कार्यालयात निमंत्रित केले आहे. येथून सर्वजण एकत्रितपणे आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन काँग्रेससोबतच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते. या बैठकीनंतर राधानगरीतील काँग्रेसच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT