Radhanagari Panchayat Samiti RY Patil Chairman Ashwini Chougule Vice Chairperson
गुडाळ : राधानगरी पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर राष्ट्रीय काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. सभापतीपदी सोळांकूरचे आर. वाय. पाटील यांची, तर उपसभापतीपदी कुडूत्री येथील अश्विनी चंद्रकांत चौगुले यांची बहुमताने निवड झाली आहे. महायुतीने दिलेल्या आव्हानाला मोडीत काढत काँग्रेसने ६-४ अशा मताधिक्याने ही पदे आपल्याकडे खेचून आणली.
निवडणुकीत राजकीय समीकरणे रंगतदार वळणावर होती. शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) दोन सदस्यांनी एकत्र येत 'महायुती' म्हणून उमेदवारी जाहीर केली होती. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे संग्राम कलिकते आणि उपसभापतीसाठी शिवसेनेचे केरबा पाटील रिंगणात होते. मात्र, काँग्रेसकडे असलेल्या ६ सदस्यांच्या स्पष्ट बहुमतामुळे महायुतीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
निवड सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिता देशमुख होत्या. काँग्रेसच्या उमेदवारांची नावे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बंद लखोट्यातून पाठवली होती. त्यांचे जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील यांनी ही नावे सभेत पोहचवली. विशेष म्हणजे, 'दैनिक पुढारी'ने या निवडीबाबत १३ फेब्रुवारी रोजी दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले असून, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दहा वर्षांनंतर काँग्रेसची वापसी: १९९६ मध्ये सुप्रिया साळोखे सभापती झाल्यानंतर तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर काँग्रेसला पुन्हा हे मानाचे पद मिळाले आहे.
सोळांकूरचा दबदबा कायम : प्रशासकीय राजवटीपूर्वी सोळांकूरच्या सौ. सोनाली पाटील सभापती होत्या. आता पुन्हा आर. वाय. पाटील यांच्या रूपाने हे पद सोळांकूरकडेच राहिले आहे.
नातेसंबंध आणि वारसा : नूतन सभापती आर. वाय. पाटील हे ज्येष्ठ नेते ए. वाय. पाटील यांचे बंधू आहेत, तर उपसभापती अश्विनी चौगुले या भोगावतीचे माजी संचालक ए. डी. पाटील यांच्या समर्थक आहेत.
विजयी जल्लोष : निवडीची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. राधानगरी तालुक्याच्या विकासाला आता नवी गती मिळेल, असा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.