गुडाळ : जंगलातून अन्न पाण्याच्या शोधात शिवारात शिरलेल्या गव्याच्या पिल्लाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी पहाटे गुडाळ येथे घडली. याबाबत वनविभाग आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खिंडी व्हरवडे - गैबी या घाट रस्त्याच्या खाली गुडाळ गावच्या हद्दीतील शेंडक नावाच्या शेतात विष्णुपंत बापू नवाळे- पाटील यांची विहीर आहे.
सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान काही ग्रामस्थांना विहिरीच्या पाण्यावर गव्याच्या पिलाचा मृतदेह तरंगतेला आढळून आला. वनविभागाला याबाबत वर्दी मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी विशाल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन रेस्क्यू टीमला पाचारण केले.
जितेंद्र साबळे आणि टीम ने जेसीबीच्या साह्याने अंदाजे 7 वर्षे वयाच्या गव्याच्या पिलाला बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर तेथेच गव्याचे दफन करण्यात आले . घाट रस्त्याच्या वरील बाजूला जंगलात गव्यांचे कळप असून रोज रात्री गवे गुडाळ आणि खिंडी व्हरवडे च्या शिवारात येऊन पिकांची नासधूस करीत असतात. यापैकीच कळपातील गवा विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडून मृत्यूमुखी पडल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.