Radhanagari Murder Case 
कोल्हापूर

Kolhapur Crime : राधानगरीत शेतीच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा धारदार शस्राने निर्घृण खून, भांडण सोडवताना पत्नीवरही हल्ला

फाले धनगरवाडा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

म्हासुर्ली : राधानगरी तालुक्यातील कोनोली तर्फ असंडोली पैकी फाले धनगरवाडा येथे शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने मानेवर व डोक्यात वार करून तरूणाचा निर्घृण खून करण्यात आला. सुरज पांडुरंग फाले (वय ३५) असे खून झालेल्या या तरूणाचे नाव आहे. या हल्ल्यात सुरजची पत्नी सोनिया (वय ३०) ही देखील गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. धोंडीराम बापू फाले, दगडू बापू फाले आणि बाबू ज्ञानू फाले अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, मूळचे फाले धनगरवाडा येथील रहिवासी असलेले सुरज फाले हे व्यवसायानिमित्त सध्या कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात वास्तव्यास होते. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ते पत्नीसह आपल्या मुळगावी आले होते. त्याच वेळी कोल्हापुरातच राहणारे आरोपी देखील आपल्या गावी आले होते. दोन्ही गटात काही कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी धारदार शस्त्राने सुरजवर सपासप वार केले. हा वार इतका भीषण होता की, मेंदू विखुरलेल्या अवस्थेत सुरजचा मृतदेह शेतात पडला होता. पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या सोनिया यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला. घटनेनंतर संशयित आरोपी धोंडीराम बापू फाले, दगडू बापू फाले आणि बाबू ज्ञानू फाले हे स्वतःहून राधानगरी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. खूनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गुन्ह्यात आणखी किती आरोपींचा समावेश होता, याचा तपास पोलीस करत आहेत. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

चारचाकी वाहनात आढळून आली बंदूक आणि दारूच्या बाटल्या

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाची (क्रमांक MH 10 BM 1322) तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांनी या गाडीची झडती घेतली असता, त्यात एक बंदूक आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT