Radhanagari Dam | राधानगरी धरणाची मुख्य भिंत सात दशकांनंतरही भक्कम  
कोल्हापूर

Radhanagari Dam | राधानगरी धरणाची मुख्य भिंत सात दशकांनंतरही भक्कम

घनता चाचणीचा अहवाल सकारात्मक; केवळ तीन ठिकाणी घनतेमध्ये किरकोळ घट

पुढारी वृत्तसेवा

नंदकुमार गुरव

राधानगरी : जिल्ह्याच्या शेती, पिण्याचे पाणी आणि एकूणच जलव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले राधानगरी धरण सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही तांत्रिकदृष्ट्या भक्कम आणि सुरक्षित असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. धरणाच्या मुख्य भिंतीची करण्यात आलेली घनता चाचणी (डेन्सिटी टेस्ट) सकारात्मक आली असून, भिंतीची मजबुती समाधानकारक असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राधानगरी धरणाच्या सुरक्षिततेबाबत निर्माण होणाऱ्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे.

पुणे येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्था (सीडब्ल्यूपीआरएस) यांच्यामार्फत गतवर्षी १६ ते २० जून या कालावधीत धरणाच्या मुख्य भिंतीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली होती. यासाठी ‘न्यूक्लिअर बोर लॉगिंग’ या प्रगत वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात आला. या चाचणीद्वारे धरणाच्या मुख्य भिंतीतील काँक्रीटची घनता आणि अंतर्गत स्थिती तपासण्यात आली. या सखोल तपासणीचा अहवाल नुकताच जलसंपदा विभागाला प्राप्त झाला आहे.

वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध

धरणाच्या भिंतीचे वय, अनेक वर्षांपासून पाण्याचा असलेला दाब, बदलते हवामान आणि दीर्घकालीन वापर या पार्श्वभूमीवर ही तपासणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विशेष म्हणजे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भिंतीच्या अंतर्गत स्थितीची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आल्याने धरणाच्या मजबुतीबाबत वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध झाली आहे.

गळतीचा अपवाद वगळता स्थिती समाधानकारक

राधानगरी धरणाच्या मुख्य भिंतीत काही ठिकाणी जुजबी गळती होत आहे. मात्र, या अपवादात्मक बाबी वगळता धरणाची मुख्य भिंत तांत्रिकदृष्ट्या मजबूत असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्याच्या जलसिंचन व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. भोगावती नदीवरील या धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांतील जलव्यवस्थेला मोठा आधार मिळतो. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेशी जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे हित जोडलेले आहे.

दहा ठिकाणांची तपासणी

धरणाच्या मुख्य भिंतीच्या मजबुतीबाबत अधिक स्पष्टता मिळावी, यासाठी एकूण दहा वेगवेगळ्या ठिकाणी घनता चाचणी घेण्यात आली. या तपासणीत दहा ठिकाणांपैकी केवळ तीन ठिकाणी घनतेमध्ये किंचित घट असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, उर्वरित सात ठिकाणांवरील स्थिती समाधानकारक असून, मुख्य भिंत मजबूत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हावासीयांना मोठा दिलासा

सात दशकांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या या ऐतिहासिक धरणाच्या मुख्य भिंतीची मजबुती समाधानकारक असल्याचे अहवालातून समोर आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळातही धरणाची नियमित तांत्रिक तपासणी, गळतीवर नियंत्रण आणि आवश्यक देखभाल-दुरुस्ती यांना प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT