गुडाळ : शिंगणापूर बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी झाल्याने राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग 500 क्युसेक वरून रविवारी (दि.१२) सायंकाळी सात वाजल्यापासून १००० क्युसेक करण्यात आलेला आहे.
राधानगरी धरणात सध्या 4:21 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या खाजगी तत्त्वावरील जलविद्युत केंद्रातून भोगावती नदीपात्रात सध्या 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. कडक उन्हाळ्यामुळे होत असलेले नदीतील पाण्याचे बाष्पीभवन आणि शेतीसाठीच्या पाणी उपशामुळे शिंगणापूर बंधाऱ्याची पाणी पातळी कमी झाली आहे.
शिंगणापूर बंधाराच्या पाणी पातळीचा समतोल व्यवस्थित असला की, या बंधाऱ्याचे बॅक वॉटर प्रयाग चिखलीच्या संगमांद्वारे कासारी नदीवरील यवलूज बंधाऱ्यापर्यंत जाते. या बंधाऱ्यावरूनच पन्हाळा नगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो. शिंगणापूर बंधाऱ्याची पाणी पातळी कमी झाल्याने बॅक वॉटर अभावी यवलुज बंधाऱ्याची पाणी पातळीही कमी झाली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने राधानगरीतील विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. दरम्यान,भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.