पवन मोहिते
कसबा बावडा : कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषी, पाणीपुरवठा आणि आर्थिक विकासाचा मुख्य कणा मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक राधानगरी धरणाने गेल्या ७२ वर्षांच्या इतिहासात कधीही जिल्ह्याला निराश केलेले नाही, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे, १९७२ च्या अत्यंत भीषण दुष्काळातही हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच शंभर वर्षांहून अधिक जुने असले तरी हे धरण आजही पूर्णपणे सुरक्षित, भक्कम आणि मजबूत असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. यंदाही मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण भरण्याच्या अगदी उंबरठ्यावर आले आहे.
भोगावती नदीवर उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक धरणाची संकल्पना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मांडली होती. त्यानुसार १९०८ मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या महायुद्धाच्या काळात (१९१८ च्या दरम्यान) या कामात काहीसा खंड पडला. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित कामाला मोठी गती दिली. टप्प्याटप्प्याने पूर्ण होत अखेर १९५४ मध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले.
सुमारे ४३ मीटर उंच आणि १,१०० मीटरहून अधिक लांबीचे हे दगडी धरण घडीव दगड, चुना आणि भाजलेल्या विटांच्या चुऱ्याच्या मिश्रणातून अत्यंत मजबूतपणे उभारण्यात आले आहे. धरणाचे १०८ चौरस किलोमीटरचे जंगलव्याप्त पाणलोट क्षेत्र दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस संकलित करत असल्याने, धरणात दरवर्षी मुबलक जलसाठा कायम राहण्यास मोठी मदत होते.
राधानगरी धरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ‘सात स्वयंचलित दरवाजे’. धरणातील पाण्याची पातळी ठरावीक मर्यादेपेक्षा वाढताच हे दरवाजे विनावीज आपोआप उघडतात आणि पाण्याची पातळी पूर्ववत कमी झाल्यावर पुन्हा बंद होतात. त्या काळातील ही अद्भुत अभियांत्रिकी संकल्पना आजही जगभरातील तंत्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे.
जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी, कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाचा प्रमुख पिण्याचा पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मिती आणि पूरनियंत्रण अशा सर्वच बाबतीत राधानगरी धरणाचे योगदान जिल्ह्याच्या समृद्धीसाठी अत्यंत मोलाचे ठरले आहे.