Radhanagari Dam Canva
कोल्हापूर

Radhanagari dam | राधानगरी जलाशयाला मिळणार 'रामसर' दर्जा

सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे वन विभागाला आदेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पश्चिम घाटाचे वैभव आणि जैवविविधतेचा अनमोल ठेवा असलेल्या राधानगरी (लक्ष्मी) जलाशयाचा समावेश आता जागतिक महत्त्वाच्या रामसर स्थळांच्या यादीत होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नागपूर येथील मुख्य वन संरक्षक कार्यालयाने या क्षेत्राचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत.

१९५८ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दाजीपूर-राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा राधानगरी जलाशय हा मुख्य कणा आहे. रानगवे, दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि औषधी वनस्पतींचे हा परिसर म्हणजे हक्काचे घर आहे. हे क्षेत्र आधीच युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे.

या सहा जलाशयांत स्पर्धा

रामसर दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहा प्रमुख पाणथळ जागांचे प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये खालील जलाशयांचा समावेश आहे:

  1. राधानगरी जलाशय (कोल्हापूर)

  2. जायकवाडी नाथसागर (छत्रपती संभाजीनगर)

  3. तानसा तलाव (ठाणे)

  4. नवेगाव तलाव (गोंदिया)

  5. तोतलाडोह धरण (नागपूर)

  6. उजनी धरण (सोलापूर)

महाराष्ट्रात सध्या लोणार सरोवर, नांदूर मध्यमेश्वर आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य या तीनच ठिकाणांना रामसर दर्जा प्राप्त आहे.

रामसर करार म्हणजे काय?

दोन फेब्रुवारी १९७१ रोजी इराणमधील रामसर शहरात जागतिक पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी हा करार झाला. १९७५ पासून जागतिक स्तरावर, तर भारतात १ फेब्रुवारी १९८२ पासून हा करार लागू करण्यात आला. जगात २४०० हून अधिक पाणथळ स्थळे असून भारतात जानेवारी २०२६ पर्यंत ९८ रामसर स्थळे घोषित झाली आहेत.

रामसर दर्जाचे फायदे काय?

  • निसर्ग रक्षण : स्थलांतरित पक्षी आणि उभयचर प्राण्यांच्या अधिवासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण मिळते.

  • नैसर्गिक फिल्टर : हे जलाशय जल शुद्धीकरण आणि पूर नियंत्रणाचे काम करतात.

  • स्थानिक अर्थव्यवस्था : इको टुरिझम वाढल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

  • हवामान नियंत्रण : कार्बन साठवून ठेवण्याच्या क्षमतेमुळे हवामान बदलाशी लढण्यास मदत होते.

"सध्या विकासाच्या नावाखाली पाणथळ जागा धोक्यात आल्या आहेत. नवीन पर्यटन धोरणामुळे कोअर झोनमध्ये हॉटेल आणि रिसॉर्टसना परवानगी मिळाल्याने कचरा आणि सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. केवळ महसूल न बघता राधानगरीला रामसर दर्जा मिळाल्यास येथील पर्यावरणीय गांभीर्य टिकून राहील."
— प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT