Radhanagari Dam | ‘राधानगरी’ ७७ टक्के भरले 
कोल्हापूर

Radhanagari Dam | ‘राधानगरी’ ७७ टक्के भरले

प्रमुख आठ धरणांत ४९.२२ टीएमसी पाणीसाठा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : धरण क्षेत्रात दोन दिवस झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ झाली. राधानगरी धरण सोमवारी रात्री ७७ टक्के भरले. काळम्मावाडी धरणाचाही साठा ४० टक्क्यांवर गेला आहे.

प्रमुख १७ पैकी १४ धरण क्षेत्रांत तर सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत २४ तासांत अतिवृष्टी झाली. सकाळी सात वाजता ७२ टक्के असलेले राधानगरी धरण रात्री ७७ टक्के भरले. धरणात दुपारी चार वाजेपर्यंत ६.११ टीएमसी पाणीसाठा झाला. काळम्मावाडी धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठ्या पावसामुळे वाढ सुरूच आहे. २५.३९ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात दुपारी चार वाजेपर्यंत १०.४१ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ४०.९८ टक्के भरले. यासह प्रमुख आठ धरणांत सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत एकूण ४९.२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ही आठ धरणे सरासरी ६१.०९ टक्के भरली आहेत. दुपारी भुदरगड तालुक्यातील फये लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला.

पंचगंगेच्या पातळीत चोवीस तासांत साडेसहा फुटांनी वाढ

पंचगंगेच्या पाणी पातळीत सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २४ तासांत तब्बल साडेसहा फुटांनी पातळी वाढली. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला. बुधवारी आणि गुरुवारी जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून अन्यत्र पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी दुपारी काही काळ जोरदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पुन्हा उघडीप दिली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. रविवारी सायंकाळी ५ वाजता २१ फुटांवर असणारी पाणी पातळी सोमवारी सायंकाळी ५ वाजता २७.५ फुटांवर गेली होती.

जिल्ह्यात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत २४ तासांत सरासरी २६.६ मि.मी. पाऊस झाला. १७ पैकी १४ धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यापैकी राधानगरी (१२४) , तुळशी (१०६), कडवी (१०५), कुंभी (१५२), पाटगाव (१३१), चित्री (१२०), सर्फनाला (११६) व कोदे (१५८ मि.मी.) या धरणक्षेत्रांत १०० मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत राधानगरीत ३५, तुळशीत ३२, वारणेत १३, दूधगंगेत २०, कासारीत १४, कडवीत २२, कुंभीत ११ तर पाटगाव धरण क्षेत्रात २१ मि.मी. पाऊस झाला.

चार धरणांतून विसर्ग

दूधगंगा धरणात चांगला पाणीसाठा झाल्याने वीज निर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणातून १०० क्युसेक विसर्ग होत आहे. घटप्रभा आणि जांबरे धरणातून विजेसाठी अनुक्रमे ९०० व २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यासह घटप्रभा धरणाच्या सांडव्यावरून २०४३ क्युसेक, जांबरेतून ६०३, धामणीतून ४ हजार ५०५ तर कोदे धरणातून ९०३ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT