राधानगरी : गेले दहा दिवस दडी मारलेल्या पावसाने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केली असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण ६६ टक्के भरले आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात ५० मिमी. इतका पाऊस झाला. दिवसभरात ५८ मिमी. पाऊस झाला असून धरण क्षेत्रात जूनपासून आजअखेर १६२६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात ५५२४.२९ द.ल.घ.फू. इतका साठा असून पाणी पातळी ३३०.५५ फूट इतकी झाली आहे. दरम्यान, दमदार पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून खोळंबलेल्या भात रोप लावणीस वेग आल्याचे चित्र दिसत आहे.
चालू वर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली आहे. जून महिना कोरडाच गेला असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु, जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली; मात्र गेले दहा दिवस पावसाने दडी मारली होती.
काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण ३४ टक्के भरले असून ८.५९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दिवसभरात २१ मिमी. पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर १२६५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी ६२८.१५ असून पाणीसाठा २४३.२०७ दशलक्ष घनमीटर (mm³) इतका आहे. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा धुमाकूळ सुरू असून धरण ५९ टक्के भरले आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत ३९ मिमी. पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर एकूण पाऊस १२८३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.