राधानगरी धरणक्षेत्र आणि आसपासच्या तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत धरणक्षेत्रात तब्बल १७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या संततधारेमुळे राधानगरी धरणातून भोगावती नदीच्या पात्रात प्रतिसेकंद अडीच हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. ताज्या आकडेवारीनुसार, धरणक्षेत्रात आतापर्यंत एकूण २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे राधानगरी धरणातील पाणीसाठा ५१.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आणि धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान केले असून, शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीत सापडले आहेत. शिरोळ, करवीर, हातकणंगले, गगनबावडा, पन्हाळा, भुदरगड आणि शाहूवाडी तालुक्यांमधील उगवलेले भात, सोयाबीन आणि काही ठिकाणी ऊस पिके पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा लवकर निचरा न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सोमवारी पहाटेपासून मुंबई, पुणे, कोकण आणि कोल्हापूर भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोकणमधील नद्या भरून वाहू लागल्या असून, नागरिकांनी नदीच्या काठावर जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुंबईत सकाळी सात वाजल्यापासून पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावर गाड्या वेळेवर धावत आहेत, पण मध्य रेल्वेवरील काही गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने येत आहेत.