राशिवडे : राधानगरी धरण क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासांत 57 मि. मी. पावसाची नोंद झाली असून धरण क्षेत्र वगळता तालुक्यामध्ये दिवसभर पावसाची उघडझाप होती. सूर्यदर्शनही झाले. पावसामुळे राधानगरी धरण 50 टक्के भरले असून मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्यातच धरण निम्मे भरल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा काळजीपूर्वक विसर्ग करावा लागणार आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये सुरू असणार्या पावसामुळे सात दिवसांमध्ये धरणामध्ये दहा टक्के पाणीसाठ्याची भर पडल्याने धरण पन्नास टक्के भरले आहे. हंगामपूर्व पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला नाही; परंतु नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.
मे महिना म्हणजे उन्हाळा - उष्णता. यादरम्यान निसर्गसंपन्न राधानगरी, अभयारण्याची सफर, नैसर्गिक गारवा अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात; पण मुलांच्या उन्हाळी सुट्टीसाठी राधानगरीकडे पर्यटनासाठी आलेले पर्यटक आता पावसाळी पर्यटन करताना दिसत आहेत.