कोल्हापूर

Gokul Election | महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी-भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल

पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आ. के. पी. पाटील यांचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

अर्जुनवाडा : महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगड तालुक्यांचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आ. के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे राधानगरी व भुदरगड तालुक्यांतील ठरावधारकांच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, सत्तेच्या पाठबळाशिवाय सहकाराच्या विकासाला गती मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या विकासाचा महायुतीचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. गोकुळच्या मागील निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मताधिक्यात राधानगरी तालुक्याचा सिंहाचा वाटा होता. यंदाच्या निवडणुकीतही राधानगरी-भुदरगड तालुका महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलेल.

माजी आ. के. पी. पाटील म्हणाले, मागील पाच वर्षांत गोकुळ दूध संघाने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. संघाने २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठले असून, मागील वेळी दिलेल्या आश्वासनानुसार दूध दरवाढही केली आहे. ‘गोकुळ’ हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट ठरला आहे. मतदान करताना मतपत्रिकेवरील नाव आणि गाव वाचत बसण्यापेक्षा ‘कपबशी’ हे चिन्ह दिसताच शिक्का मारावा. राधानगरी-भुदरगड तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरावधारक महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विरोधक वेगवेगळ्या कथा सांगून मतदारांचा मनभेद करण्याचे काम करीत आहेत. गेल्या निवडणुकीत राधानगरी-भुदरगड तालुक्याने मताधिक्याचा उच्चांक केला होता. या निवडणुकीतही तो उच्चांक अबाधित राहील याची मला खात्री आहे. गोकुळ दूध संघाची ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्याकडे निघालेली आहे. घटस्थापना होऊन पवित्र असा दसरा सणही सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर ठरावधारक सभासदांना नवदुर्गासह विविध देव-देवतांचे दर्शन घडवण्याची ही सुवर्णसंधी आहे. सर्वच नेतेमंडळींनी मतदार बंधू-भगिनींना देवदर्शनाला घेऊन जाऊन पवित्र अशा नवरात्रीच्या उत्सवामध्ये लवकरात लवकर देवदर्शन घडवून भाग्य मिळवावे.

समस्त दूध उत्पादकांचा अपमान...!

माजी आ. के. पी. पाटील म्हणाले, विरोधी आघाडीचे नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांची किंमत तीन हजार रुपये करून ते अपमान करीत आहेत. ही पाकिटे आम्हाला मानणाऱ्या मतदारांनाच देण्याचा त्यांचा प्रचंड खटाटोप सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT