कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढू नये याकरिता राज्य शासन सर्व बाजूने प्रयत्न करत असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी रात्री कोल्हापूर विमानतळावर सांगितले. कोल्हापूर आणि सांगलीच्या जनतेच्या हिताला बाधा येऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अलमट्टी धरणाची सध्याची पाणी पातळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती गंभीर होण्यास कारणीभूत ठरते. असे असताना कर्नाटकने अलमट्टीची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर आणि सांगली दरवर्षी महापूराची स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास या दोन्ही जिल्ह्यातून त्रिव— विरोध होत आहे. राज्य शासनाने ही धरणाची उंची वाढवण्यास विरोध केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौर्यावर आलेल्या विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती साठी अलमट्टी धरण आणि त्यापूर्वी येणारे हिप्परगी ब्यारेजचाही इश्श्यु आहे. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला राज्य शासनाचा विरोधच आहे. याबाबत राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतलेली आहे .त्या प्रकरणावर एक सुनावणी झालेली आहे.
अलमट्टीबाबत प्रशासकीय पातळीवरील बैठका सुरू आहेत. अलमट्टी ची वाडीला विरोध करणार्या लोकांसोबत ही आपण बैठक घेतलेली आहे. अधिकारीही त्यावर काम करत आहेत. केंद्र शासनाकडे याबाबत चार राज्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ही राज्य शासन आपली भूमिका ठामपणे मांडली असेही विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. दरम्यान दोन दिवसाच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या विखे पाटील यांचे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता कोल्हापुरी विमानतळावर आगमन झाले. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत मेहेत्रे व कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.