के. एस. रानगे
वाशी : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्याकरिता संस्था ठराव आपले नावे घेण्यासाठी करवीर तालुक्यासह वाशी परिसरातील संस्थाचालक कारभाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नेत्यांचा शब्द, मर्जीसाठी संस्था संचालक मंडळांच्या बैठकीतून ठराव घेण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे.
काही संस्थांमध्ये आर्थिक बोली होत आहेत. काही संस्था संचालकांमध्ये देवाणघेवाणीवरून वादाचे खटके उडत आहेत. त्यामुळे गोकुळ निवडणुकीच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून तालुक्यातील संस्था कारभाऱ्यांमधील राजकारण चांगलेच तापले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संस्थांकडे ठराव मागणीसाठी मसुदा तयार करून रजिस्टर एडी पोस्टाने कागदपत्रे संस्थांना पाठवण्यात आली आहेत. करवीर तालुक्यातील नेत्यांच्या वरदहस्तामुळे प्रत्येक गावात सहकारी दूध संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. छोट्या-मोठ्या पुढार्यांनी दूध संस्था स्थापन करून गोकुळमध्ये आपल्या नेत्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठरावासाठी आग्रही असणाऱ्या राजकीय गटबाजींमुळे प्रत्येक संस्थेत मतभेदांवरून दुफळी निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या चढाओढीतून संस्थाचालकांचे वैयक्तिक मतभेद चव्हाट्यावर येत आहेत.
आम्ही फक्त दूध घालतो, मलिदा तुम्ही खावा
वाशी परिसरातील एका दूध संस्थेत ठराव देण्यावरून संस्थाचालकांमध्ये वाद सुरू होता. ठरावासाठी चाललेली वादावादी ऐकून एक सभासद त्या ठिकाणी गेला. आम्ही फक्त दूधच घालायचे आणि मलिदा तुम्ही खायचा काय, असा सवाल यावेळी उपस्थित केला.
सचिवांकडे दुर्लक्ष
ठराव मिळवण्यावरून संस्थाचालकांमध्ये चढाओढ सुरू आहे. कागदपत्रे तयार करणारा सचिव हा संस्थेचा दुवा मानला जातो. या सचिवांकडे नेत्यांसह संस्थाचालकांचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.