कोल्हापूर : शेंडा पार्क येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ११०० बेडच्या नवीन रुग्णालयाच्या इमारतीबाबत एक धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एक कॉलम चक्क तिरका (मिसअलायमेंट) झाल्याचे उघडकीस आले असून, यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेंडा पार्क येथे कॅन्सर रुग्णालय, सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणि रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे अजून दोन मजले बांधले जाणार आहेत. मात्र, पाचव्या मजल्यावरील सेंट्रिंगचा पेल्टा काढल्यानंतर येथील एक मुख्य कॉलम तिरका झाल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. हा प्रकार लपवण्यासाठी गुरुवारी दिवसभर हा कॉलम पोत्यांनी झाकून ठेवण्यात आला होता, तर रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने तो सरळ करण्याची डागडुजी सुरू होती.
कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत असलेले हे रुग्णालय जिल्ह्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नको, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे बांधकाम विभाग संबंधित ठेकेदारकडून दर्जेदार काम करून घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने यावर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सेंट्रल गव्हर्न्मेंटच्या पीएमसीला (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी) इमारतीच्या प्लॅननुसार या बांधकामाची सविस्तर माहिती देण्याचे पत्र आम्ही पाठवले आहे. रुग्णालयाचे बांधकाम दर्जेदारच झाले पाहिजे, यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही.डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय