'केबिनमध्ये एकटीच ये, तुला समजून सांगतो!' म्हणत विद्यार्थिनींच्या अवयवांवर अश्लील भाष्य करणाऱ्या प्रा. सौरभ जोशीचा पाढा उघड  File Photo
कोल्हापूर

'केबिनमध्ये एकटीच ये, तुला समजून सांगतो!' म्हणत विद्यार्थिनींच्या अवयवांवर अश्लील भाष्य करणाऱ्या प्रा. सौरभ जोशीचा पाढा उघड

तक्रारींमध्ये गंभीर मुद्दे; अश्लीलतेसोबत बेकायदेशीरपणातही सहभाग : विद्यार्थिनी तणावाखाली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : केबिनमध्ये एकटीच ये, तुला समजून सांगतो, असे म्हणून विद्यार्थिनींना बोलवायचे. मुलगी भेटायला आली की, तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचे. अवयवांबाबत अश्लील भाष्य करायचे. अभ्यासाबाबत काहीतरी सांगण्याच्या बहाण्याने चुकीचा स्पर्श करायचा. तसेच, विद्यार्थिनींना फोन करून लज्जास्पद बोलायचे आणि याबाबत कुठेही तक्रार किंवा वाच्यता केल्यास हजेरी कमी दाखवून विषयांतर्गत कमी गुण देऊन दबाव आणून त्रास द्यायचा. कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी याच्यावरील आरोपांमधून त्याच्या अनैतिकपणाचा पाढाच समोर आला आहे. पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारींमध्ये प्रा. जोशी याच्याविरोधात गंभीर मुद्दे असून, यामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली आहेत.

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणार्‍या प्रा. जोशी याच्या कामकाजाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महाविद्यालयात सकाळी 9 वाजता उपस्थिती लावल्यानंतर अनेकदा दिवसभर तो बाहेर फिरून किंवा घरी थांबून संध्याकाळी पुन्हा हजेरी लावण्यासाठी येत असल्याचेही आता समोर येत आहे. मात्र, जोशी याच्या या मनमानी कारभाराबाबत प्रशासनाकडून कधीच ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. महाविद्यालयातीलच एक महत्त्वाचा पदाधिकारी जोशी याचा नात्याने मामा आहे. त्याच्या पाठबळामुळे जोशी याला संस्थेमध्ये संरक्षण मिळत असल्याची चर्चा महाविद्यालयाच्या वर्तुळात सुरू आहे. तसेच, जोशी याच्या बेकायदेशीर बाबींमध्ये काही प्राध्यापकांनीही त्याला पाठीशी घातल्याची कुजबूज सुरू आहे.

नावावरील पेटंटची चौकशी व्हायला हवी

प्रा. जोशी याच्या नावावर तब्बल 21 पेटंट आहेत. संशोधन आणि कठोर परिश्रमातून पेटंट मिळवावे लागतात. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने पेटंट कशा पद्धतीने मिळाली, याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे. तसेच, त्याने मिळवलेली डॉक्टरेटदेखील बेकायदेशीरपणे मिळवली असावी, असा मुद्दा अधोरेखित होत आहे.

माजी विद्यार्थी...कॉपी बहाद्दूर ते विभागप्रमुख

जोशी हा संबंधित महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना परीक्षेत कॉपी प्रकरणात त्याला पकडण्यात आले होते. ज्या प्राध्यापिकेने त्याची कॉपी पकडली तिच्यावर दबाव आणून तसेच शिक्षण क्षेत्रातील ओळखींचा गैरवापर करत त्याने कॉपी प्रकरणातून सुटका करून घेतली होती. शालेय व महाविद्यालयीन काळातही अनेक भानगडी करणे, खोटेपणा करणे, गैरवर्तन करणे अशी त्याची वृत्ती असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर जोशी याच्या काही शालेय वर्गमित्रांनी नमूद केल्या आहेत.

तक्रार निवारण समितीतील कीड

महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती आहे. या समितीमध्ये प्रा. जोशीचाही समावेश आहे. मात्र, विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्यानंतर तक्रार करशील तर खबरदार अशी धमकी द्यायचा. संबंधित तक्रारदार विद्यार्थिनीवर दबाव आणण्यासाठी तिची वर्गातील हजेरी जोशी याने 60 टक्केच दाखवली. जिथे तक्रार करायची त्या समितीतच जोशी असल्याने कुंपणच शेत खाते, असे चित्र आहे. तर तक्रार निवारण समितीतील काही सदस्य जोशी याच्या दबावातून, पीडित विद्यार्थिनीला आता समितीकडून तुला कोणतीही मदत मिळणार नाही, असे म्हणत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

SCROLL FOR NEXT