कोल्हापूर : कोल्हापुरात वैद्यकीय सुविधांच्या नावाने जी खिरापत वाटली गेली, त्यामध्ये तब्बल 6 कोटी 73 लाख 55 हजार 200 रुपयांच्या व्हेंटिलेटर्स खरेदीला मंजुरी दिली. बाजारात या व्हेंटिलेटर्सची अॅडव्हान्समेंटनुसार सरासरी किंमत 5 ते 9 लाखांच्या घरात आहे. मग या व्हेंटिलेटर्ससाठी प्रतिनग 15 लाख ते 34 लाखांपर्यंत किंमत का मोजली जाते? वैद्यकीय वर्तुळात व्हेंटिलेटर्सच्या खरेदीमध्ये मोठा मलिदा असल्याची चर्चा सर्वश्रुत आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालयात नव्या व्हेंटिलेटर्स खरेदीचा ऑक्सिजन कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा कमी पडू लागला की, कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटर्स हे उपकरण उपयोगात आणले जाते. कोरोना काळात या उपकरणाने लाखो रुग्णांना दिलासा दिला. केंद्र शासनाने देशामध्ये कमतरता असलेली व्हेंटिलेटर्सची संख्या पाहून परदेशातून व्हेंटिलेटर्स आयात केले आणि भारतीय उद्योजकांना व्हेंटिलेटर्स बनविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाने हजारो व्हेंटिलेटर्सची खरेदी करून जिल्हा कोव्हिड रुग्णालयांपर्यंत वितरण केले. राज्य शासनानेही हाफकिन इन्स्टिट्यूटमार्फत राज्यभर व्हेंटिलेटर्स पुरविले. जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधीतूनही खरेदी झाली आणि काही दानशूर व्यक्तींनी व्हेंटिलेटर्स दान करून हातभार लावला. एवढ्या व्हेंटिलेटर्सची मांदियाळी असताना राज्य शासन व्हेंटिलेटर्सची खरेदी कशासाठी करते आहे?
कोल्हापुरात तब्बल 6 कोटी 73 लाख 55 हजार 200 रुपयांच्या व्हेंटिलेटर्स खरेदीला मंजुरी दिली. बाजारात या व्हेंटिलेटर्सची अॅडव्हान्समेंटनुसार सरासरी किंमत 5 ते 9 लाखांच्या घरात आहे. येथील खासगी रुग्णालयांनी या दरात ही उपकरणे स्थापितही केली आहेत. मग प्रतिनग 15 लाख ते 34 लाखांपर्यंत किंमत का मोजली जाते? त्याहीपेक्षा सीपीआर रुग्णालयाला खरोखरीच व्हेंटिलेटर्सची गरज होती का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी जी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली, त्यामध्ये रुग्णालयात 165 व्हेंटिलेटर्स उपलब्ध असल्याचे नमूद केले होते. यापैकी 113 व्हेंटिलेटर्स कार्यान्वित आहेत आणि उर्वरितांना दुरुस्तीची गरज आहे, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात आज हे 113 व्हेंटिलेटर्सही कुठे आहेत, हा प्रश्न आहे. मग नव्या खरेदीमागील गमक काय याविषयी मेंदूला जरा ताण दिला की, सीपीआरमध्ये निधीचे लचके तोडणार्या घुशींचे साम्राज्य किती वाढले आहे, याची कल्पना येऊ शकते.
व्हेंटिलेटर्सबाबत गलथानपणाचा कळस किती असावा, याचे उदाहरण वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने घालून दिले होते. रुग्ण तडफडत असताना व्हेंटिलेटर्स नाहीत, असे उत्तर दिले जात होते. यावर दैनिक ‘पुढारी’ने रुग्णालयाच्या भांडारात पॅकिंगही न फोडलेले व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून आहेत, याकडे लक्ष वेधले आणि गलथानपणाचे भांडे फोडले. यावर चौकशी समिती नियुक्त झाली. पण निष्कर्ष शून्य. या व्हेंटिलेटर्स खरेदीबरोबर पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचे करारही (एएमसी) केले जातात. मग कोरोना काळ संपून अडीच वर्षे होण्यापूर्वीच व्हेंटिलेटर्स नादुरुस्ती अवस्थेत पडून कसे राहतात, नव्या व्हेंटिलेटर्सचे प्रस्ताव तयार कसे केले जातात? सर्वत्रच बेबंदशाही थैमान घालते आहे.