कोल्हापूर : फार्मसी महाविद्यालयांची आता क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया तपासणी करणार आहे. गुणवत्तेचा निकष लावून त्यांची रँकिंग निश्चित करणार आहे. नवीन बदलामुळे आता शिक्षण क्षेत्रात शिस्त, गुणवत्ता अधिक वाढणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले महाविद्यालय निवडीसाठी याचा फायदा होणार आहे.
गेल्या काही वर्षांत फार्मसी महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. परंतु, काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना प्रलोभने देऊन त्यांची दिशाभूल केली जात असल्याने निदर्शनास आले आहे. सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल सुरू आहेत. त्याअनुषंगाने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने देशपातळीवरील क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाशी करार केला आहे.
राज्यभरात बी.फार्मसीची 550 महाविद्यालये असून, प्रवेश क्षमता 48 हजार, तर डी.फार्मसीची 675 महाविद्यालये असून, 41 हजार प्रवेश जागा आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये बी.फार्मसीची 38 महाविद्यालये व प्रवेश क्षमता 2 हजार 400, तर एम.फार्मसीची 23 महाविद्यालये असून, 1 हजार 310 प्रवेश क्षमता आहे.
रँकिंगसाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ—ेमवर्कचा (एनआयआरएफ) वापर केला जात होता. त्यात बदल करण्यात आला असून, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून फार्मसी महाविद्यालयांची रँकिंग केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी मिळणारी जीवनकौशल्ये, शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, प्रयोगशाळा, वातावरण, ग्रंथालय, नोकरीसाठी तयारी, शिक्षकांचे प्रमाण, संशोधन आणि विद्यार्थी प्रगती अशा विविध निकषांवर रँकिंग दिली जाणार आहे.
डी.फार्मसी 675 महाविद्यालये : 41 हजार प्रवेश जागा
बी.फार्मसी 550 महाविद्यालये : प्रवेश क्षमता 48 हजार
बी.फार्मसी 38 महाविद्यालये व प्रवेश क्षमता 2 हजार 400 (कोल्हापूर, सांगली, सातारा)
एम.फार्मसी 23 महाविद्यालये व 1 हजार 310 प्रवेश क्षमता (कोल्हापूर, सांगली, सातारा)