टोप : ‘कुठे आहेस बाळा तन्मय? तुझे बाबा, आई आणि संपूर्ण कुटुंबीय, नातेवाईक रात्रंदिवस तुझीच वाट पाहत आहोत... तू एका शब्दाने जरी संपर्क साधलास, तरी आमच्या जीवात जीव येईल!’ अशा कातर आणि व्याकूळ शब्दांत वंगे कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या मुलाच्या शोधासाठी समाजाला तसेच थेट तन्मयला भावनिक साद घातली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बीजे मेडिकल कॉलेजमध्ये (ससून शासकीय रुग्णालय) एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारा आणि पेठ वडगाव येथे राहणाऱ्या शिक्षक दाम्पत्याचा २० वर्षीय मुलगा तन्मय अजयकुमार वंगे हा शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी कॉलेजच्या वसतिगृहातून अचानक निघून गेला. त्यानंतर आजअखेर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
तन्मय उच्च शिक्षण पूर्ण करून डॉक्टर व्हावा, अशी आई-वडिलांची इच्छा होती. त्याच आशेने त्याच्या भवितव्याकडे पाहणाऱ्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू आता थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गेल्या अडीच महिन्यांपासून घरातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या एका फोनची किंवा सुखरूप असल्याच्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहे. तन्मयचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने पुणे, सोलापूर, नगर तसेच परिसरातील अनेक ठिकाणी शोध घेतला आहे. विविध ठिकाणी चौकशी करूनही अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
दरम्यान, सध्या कुटुंबीय शिर्डी-नाशिक परिसरातील विविध धार्मिक स्थळे, आश्रम आणि अशा ठिकाणी तन्मयचा शोध घेत आहेत, जिथे राहण्याची तसेच भोजनाची सोय सहज उपलब्ध होते. तन्मयने या परिसरातील एखाद्या ठिकाणी आश्रय घेतला असण्याची शक्यता गृहीत धरून कुटुंबीयांकडून शोधमोहीम सुरू आहे.
‘तू कुठेही असशील, सुखरूप असशील तर फक्त एकदा फोन कर. तुला काहीही विचारले जाणार नाही. तुझ्या एका फोनने आमच्या काळजाला आधार मिळेल,’ अशी आर्त विनवणी तन्मयच्या आई-वडिलांनी केली आहे.
तन्मयबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने कुटुंबीयांशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून मुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या वंगे कुटुंबीयांना तन्मय सुखरूप परतण्याची आशा अजूनही आहे.