Ambap Phata Container Accident
पेठवडगाव : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबप फाट्याजवळ शुक्रवारी (दि.१७) दुपारी तीनच्या सुमारास कंटेनर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत कंटेनर चालक जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अंबप फाटा परिसरातील पाटील पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. एमएच ४३ बीजी ९७९३ क्रमांकाचा कंटेनर पावसामुळे निसरडा झालेल्या सर्व्हिस रोडवरून घसरून रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
पावसामुळे सर्व्हिस रोडवर चिखल साचला असून रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. पलटी झालेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
दरम्यान, अंबप फाटा ते वाठार परिसरातील सर्व्हिस रोडची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे संदीप दबडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि अपुऱ्या देखभालीमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.