नागाव : पुलाची शिरोली ता. हातकणंगले गावातील कचरा शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक भवनच्या प्रवेशद्वाराजवळ टाकला जात असल्याने याठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, या कचऱ्यातील वेस्ट खाण्यासाठी परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वेगाने वाढली आहे. यातील दोन कुत्री पिसाळल्यामुळे स्मॅक भवनमध्ये येणारे उद्योजक आणि दवाखान्यात उपचारासाठी येणारे कामगार यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
निवेदन देऊनही दुर्लक्ष
शिरोली गावातील कचरा गेल्या काही वर्षांपासून अधिकृत किंवा अनधिकृतपणे थेट ‘स्मॅक’ भवनच्या प्रवेशद्वाराजवळच टाकला जात आहे. या समस्येबाबत ‘स्मॅक’च्या वतीने ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. हा कचरा डेपो तातडीने इतरत्र हटवावा, अशी मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक व उद्योजकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ
कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे या भागात कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सध्या या कुत्र्यांच्या टोळीतील दोन कुत्री पूर्णपणे पिसाळलेली आहेत. स्मॅक भवनमध्ये विविध व्यावसायिक कामांसाठी येणारे उद्योजक, तसेच परिसरातील दवाखान्यात औषधोपचारासाठी येणारे कामगार आणि नागरिक यांच्यावर ही कुत्री अचानक पाठलाग करून धावून जात आहेत. यामुळे कधीही एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
तातडीने कारवाईची मागणी
उद्योगांचे केंद्र असलेल्या शिरोली एमआयडीसी परिसरामध्ये सुरक्षेचा व आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्मॅक भवन समोरील कचरा डेपो तत्काळ हटवावा आणि पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उद्योजक व कामगारांमधून होत आहे.