कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेतलेल्या पुढारी टॅलेंट सर्च व राज्य शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात दुबई येथील विदेश दौर्‍यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत डावीकडून डॉ. सुनील लोंढे, विजय जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, एस. कार्तिकेयन, डॉ. मीना शेंडकर, आर. व्ही. कांबळे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी.  Pudhari File Photo
कोल्हापूर

स्वप्नं मोठी पाहा; पण पाय जमिनीवर ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : स्वप्न मोठी पहा, पण पाय नेहमीच जमिनीवर ठेवा आणि देशाच्या जडणघडणीत योगदान द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी केले. दैनिक पुढारी आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुढारी टॅलेंट सर्च व राज्य शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या शानदार समारंभाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात विदेश दौर्‍यासाठी निवड झालेल्या 7 विद्यार्थ्यांसह राज्यस्तरीय शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक 25 विद्यार्थ्यांचा व पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेत यश मिळवलेल्या 77 विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर,दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, दै. पुढारी पुणेचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, शाळेचा आणि शिक्षकांचा अभिमान वाटावा अशी कामगिरी तुम्ही केली आहे. हे एक बेंचमार्क आहे, यापुढे मागे वळून पहायचं नाही, फक्त पुढेच वाटचाल करत रहायची. देशाच्या भविष्यातील महत्वाचे घटक असलेल्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या समन्वयातून सुरु असलेली शैक्षणिक क्षेत्रातील यशदायी वाटचाल कौतुकास्पद आहे. राज्यस्तरावर शैक्षणिक स्पर्धा, परीक्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने लक्ष वेधले आहे. भविष्यात हा आलेख अधिक उंचावण्यासाठी जे जिल्हे टॉपवर आहेत त्यांचा आढावा घेउन कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांच्या ध्येयाला सक्षम बनवण्याचे नियोजन केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले, 2025 हे वर्ष कोल्हापूरसाठी शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करणारे ठरले आहे. सर्वेक्षणात कोल्हापूर जिल्हा देशात टॉप 50 मध्ये आहे. संपादणूक सर्वेक्षणात कोल्हापूरने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर शिष्यवृत्ती परीक्षेत 30 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांची ही घोडदौड कोल्हापूरची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित करते. ज्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढते त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशसंख्या कमी होते हे सर्वसाधारण निरीक्षण आहे. मात्र कोल्हापूर याला अपवाद ठरत असून दरडोई उत्पन्नात आघाडीवर असलेल्या कोल्हापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढतच आहे. यामागे पालकांचा विश्वास आहे. भविष्यात गुणवत्ता वाढ आणि पायाभूत सुविधा वाढ यासाठी शंभर कोटींचे नियोजन असून याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रास्ताविकात डॉ. मीना शेंडकर म्हणाल्या, शिक्षण कशा पद्धतीने विद्यार्थी जीवनाचा कायापालट करू शकते हे या टॅलेंट सर्च स्पर्धेने दाखवून दिले. विद्यार्थ्यांना शालेय वयात मिळणारी संधी, मार्गदर्शन, बौद्धिक प्रेरणा यामुळे विद्यार्थी घडू शकतात. कोल्हापुरातील पालकांमध्ये ही जाणीव सजग असल्याने या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षभरात जिल्हापरिषद, दै. ‘पुढारी’ आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या सकारात्मक संवादाचे हे फलित आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रेरणेचे बीज रोवून विद्यार्थ्यांना घडवणारा हा उपक्रम नक्कीच विद्यार्थ्यांना आयुष्याचं सोनं करेल.

डॉ. लोंढे म्हणाले, विद्यार्थिदशेत अशा संधी मिळणे खूप गरजेचे आहे. या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग दै. ‘पुढारी’ला बनता आले याचा आनंद वाटतो. जाधव म्हणाले, गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 185 परीक्षा केंद्रांवर 22 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि सकारात्मक दिशा देण्याचे काम जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि दै. ‘पुढारी’ यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना लढ म्हणणारा आवाज गरजेचा असतो आणि तो आवाज या स्पर्धेने दिला आहे.

प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. सीताराम जाधव यांनी महाराष्ट्र गीत गायन केले. डॉ. लोंढे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी प्राथमिक शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी वैभव पाटील, (चंदगड), प्रबोध कांबळे (भुदरगड), धनंजय मेंगाणे (राधानगरी), संदीप यादव (पन्हाळा), भारती कोळी (शिरोळ), वसुंधरा कदम (गगनबावडा), विश्वास सुतार (शाहूवाडी), बसवराज गुरव (आजरा), हळबा गोळ (गडहिंग्लज), सारिका कासोटे (कागल), आम्रपाली दिवेकर, बाबुराव पाटील, अधीक्षक सचिन जाधव, शशी कदम आदी गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले. दै. ‘पुढारी’चे वितरण व्यवस्थापक अशोक पाटील यांनी आभार मानले.

जिल्हाधिकार्‍यांचा विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र

कोणतंही यश मिळालं तरी नम्र राहा, अहंकाराला थारा देऊ नका. आजन्म विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न करा. संगत आणि सवयी योग्य ठेवा. जगभरातील माहिती मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध आहे, योग्य पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करा. मोबाईलमधून शिक्षण घेतलं तर तो साधन होतो, पण वेळ वाया घालवला तर तो अडथळा बनतो हे नेहमी लक्षात ठेवा, असा कानमंत्र जिल्हाधिकारी येडगे यांनी दिला.

शिक्षक व पालकांना दिला संदेश

जिल्हाधिकार्‍यांनी शिक्षक व पालकांचे विशेष कौतुक करत, विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यात त्यांचा वाटा मोठा असल्याचे सांगितले. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता आणि देशभक्तीची गरज आहे शिक्षकांनी मुलांना रोज नवीन काय शिकवता येईल याचा विचार करावा. पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचे कोणतेही क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे आणि पाठबळ द्यावे, असा संदेश दिला.

पुढे जाताना मागे वळून पाहायला विसरू नका

शेवटी विद्यार्थ्यांना आपल्या मूळ गाव, परिस्थिती आणि पार्श्वभूमी विसरू नये, असं सांगत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. ‘तुम्ही कुठून आलात हे विसरू नका, जेथून उगम आहे तिथं काही तरी परत देण्याचा विचार ठेवा,’ असं त्यांनी सांगितलं.

निकुंज नकातेच्या कुटुंबात पहिल्यांदाच पासपोर्ट आला

राशिवडे येथील निकुंज नरेंद्र नकाते याची दुबई येथे होणार्‍या विदेश दौर्‍यासाठी निवड झाली आहे. या निवडीने त्याच्या पालकांना खूप आनंद झाला आहे. आजपर्यंत आमच्या घरात कधीच पासपोर्ट काढण्याची संधी मिळाली नाही. पण पाचवीत शिकणार्‍या माझ्या मुलाने आमच्या कुटुंबात पहिल्यांदा पासपोर्ट आणला याचा आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना निकुंजचे वडील नरेंद्र नकाते यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT