काळम्मावाडी : शिक्षण हा एक संस्कार आहे. तो अडचणीतल्या विद्यार्थ्यांत रुजवून दैनिक ‘पुढारी’ने त्याचा उत्सव केला आहे. ‘पायपीट’ उपक्रमातून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदतीच्या माध्यमातून दिलेला शैक्षणिक मदतीचा हात उद्याच्या उज्ज्वल भविष्य असणार्या चिमुकल्यांना निश्चितच पुढे नेवू शकतो. दै. ‘पुढारी’ची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी काढले.
दै. ‘पुढारी’च्या वतीने काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील केंद्रशाळा दूधगंगानगरमध्ये ‘पायपीट’ उपक्रमांतर्गत शिक्षणासाठी पायपीट करणार्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (प्रशासन) राजेंद्र मांडवकर, वितरण व्यवस्थापक अमर पाटील, अशोक पाटील, डॉ. नेहा शहा, अभिषेक शहा, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, सरपंच वैशाली डवर उपस्थित होते.
अभिषेक शहा म्हणाले, मी ज्या परिस्थितीत शिक्षण घेतले त्यावेळी माझीही बिकट वाट होती. मीही पायपीट करीत शाळा शिकलो म्हणून अशा लहान मुलांना मदत करण्याची भूमिका घेतली. भविष्यात याच मुलांनी मोठे झाल्यावर त्यावेळच्या लहान मुलांना मदत करावी एवढीच अपेक्षा आहे. डॉ. नेहा शहा म्हणाल्या, ग्रामीण विद्यार्थ्यांतही प्रतिभा असते. त्यांना प्रोत्साहन देणे एवढाच आमचा उद्देश असून तो दै. ‘पुढारी’च्या पायपीट उपक्रमामुळे सफल झाला आहे.
राजेंद्र मांडवकर म्हणाले, पहिलीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या गरजू मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा दै. ‘पुढारी’चा ध्यास आहे. म्हणूनच जिल्ह्यातील 13 शाळांमध्ये ‘पायपीट’ उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापुरातील मुलींना ज्युदोचे प्रशिक्षण देणे, दहावी अभ्यास मालिका, दरवर्षी ‘एज्युदिशा’ शैक्षणिक प्रदर्शन भरवणे, टॅलेंट सर्च परीक्षा घेणे आणि धुळे, नंदुरबार येथील आदिवासी भागात मुलांसाठी स्पर्धा परीक्षा घेणे असे उपक्रम ‘पुढारी’मार्फत राबवले जातात. याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. अमर पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या वाड्या-वस्त्यांवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. याचा विचार करून ‘पुढारी’ने मुलांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला अभिषेक शहा आणि डॉ. नेहा शहा यांनी दातृत्व दिले.
अशोक पाटील म्हणाले, दूधगंगानगर या शाळेतील सर्व 100 टक्के मुले पायपीट करीतच शाळेत येतात. त्यांच्यासमोर दूसरा पर्यायच नाही. दूधगंगानगर, राजापूर, धावूरवाडी, करंजवाडा अशा भागातून ही मुले येतात. दै. ‘पुढारी’च्या पायपीट उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. मुख्याध्यापक संतोष कांबळे यांनी ‘पुढारी’ने कित्येक किलोमीटर पायपीट करणार्या विद्यार्थ्यांची दखल घेऊन शालोपयोगी साहित्य दिल्याबद्दल धन्यवाद दिले. शशी पाटील यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, जिल्हा परिषद कक्ष अधिकारी सचिन जाधव, निवृत्त उपशिक्षणाधिकारी भीमराव टोणपे, माजी सरपंच संदीप डवर, माजी उपसरपंच विनोद डवर, महादेव तळेकर, बाबुराव नाटेकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अनिल महाडिक, उपाध्यक्षा सोनाली कडावे आदी उपस्थित होते. उमर पन्हाळकर यांनी आभार मानले.