कोल्हापूर : महिला सबलीकरणासह त्यांच्या आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांच्यात खेळांची आवड निर्माण व्हावी व क्रीडा कौशल्याला पाठबळ मिळावे, या उद्देशाने ‘पुढारी राईजअप’ स्पर्धांचे राज्यव्यापी आयोजन दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने केले जाते. याअंतर्गत क्रीडानगरी कोल्हापुरात दुसऱ्यांदा ऑक्सीरिच प्रस्तुत ‘पुढारी राईजअप’ ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर दि. 21 व 22 मार्च रोजी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे सहप्रायोजक चितळे डेअरी व डॉ. धपाटेज क्लिनिक आहेत.
‘पुढारी राईजअप’ ही संकल्पना स्त्री शक्तीच्या सबलीकरणासाठी दैनिक ‘पुढारी’ने उचललेले पाऊल आहे. महिलांच्या क्रीडागुणांना बळ देऊन त्यासाठीचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. समूहाच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ आणि ऑनलाईन माध्यमातून या स्पर्धांना ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळणारी व्यापक प्रसिद्धी यामुळे या स्पर्धा शहरातील प्रमुख लक्षवेधी इव्हेंट ठरत आहे. ‘पुढारी’ने गेली चार वर्षे या स्पर्धा या राज्यव्यापी स्पर्धा घेतल्या जातात. कोल्हापुरातील स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे.
कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सहकार्य
महाराष्ट्र ॲथलेटिक्स असो. पुणे यांना संलग्न कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने आणि तांत्रिक मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. यासाठी राज्य अध्यक्ष आदिल सुमारीवाला, सचिव सतीश उचिल यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष एस. व्ही. सूर्यवंशी, उपाध्यक्ष हेमंत सरनाईक, सचिव प्रकुल पाटील-मांगोरे, खजानीस आर. डी. पाटील, सदस्य आर. बी. पाटील, आर. व्ही. शेटगे, के. एस. लाड, सयाजी पाटील, सतीश पाटील, सचिन पाटील, अमोल आळवेकर व सहकारी सक्रिय आहेत.
दोन जिल्ह्यांसाठी सहा वयोगटांत स्पर्धा
कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि खासगी संस्था व क्लबमधील महिला खेळाडूंसाठी ही स्पर्धा होणार आहे. 9, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील अशा एकूण सहा वयोगटांकरिता ही स्पर्धा होत आहे.
39 प्रकारांत होणार स्पर्धा
ॲथलेटिक्स स्पर्धा विविध 39 प्रकारांत होणार आहे. यात 30, 50, 80, 100, 200, 400, 600, 800, 1000, 1500 व 3 हजार मीटर धावणे, 80 व 100 मीटर अडथळा, 4 बाय 100 मीटर व गोळाफेक, उंच उडी, लांब उडी या प्रकारांचा समावेश आहे.
प्रत्येक इव्हेंटच्या विजेत्यांना बक्षीस
स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रत्येक इव्हेंटच्या विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. यात पदक, प्रमाणपत्र आणि रोख रकमेसह विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
अर्जाद्वारेही करता येणार नोंदणी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरूनही नोंदणी करता येणार आहे. दैनिक ‘पुढारी’तून या स्पर्धेची प्रवेशिका (नोंदणी अर्ज) प्रकाशित करण्यात आली आहे. या अर्जाचे कात्रण कापून, त्यावरील खेळाडूंची सर्व माहिती भरून तो अर्ज दै. ‘पुढारी’च्या नजीकच्या कार्यालयात दि. 18 मार्चपर्यंत जमा करावा लागणार आहे. अर्ज सादर करताना त्या अर्जाची झेरॉक्स प्रत काढून, त्यावर कार्यालयाची पोच घ्यावी.
18 मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना दि. 18 मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. यानंतर ऑनलाईन अर्ज नोंदणी बंद होणार आहे. ऑफलाईन प्रवेशिकेची अंतिम तारीख दि. 18 मार्चपर्यंत असणार आहे. ऑनलाईन नावनोंदणी हीींंीि:///// ज्ञवरर.ळप या संकेतस्थळावर करावी. स्पर्धेत महिला-मुलींनी, मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी कोल्हापूर : 8149582442, सांगली : 8805007724 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’ परिवाराने केले आहे.