कोल्हापूर : 1) ‘पुढारी राईज अप’ स्पर्धेचा प्रारंभ शनिवारी क्रीडा मशाल प्रज्वलित करून करताना महापौर रूपाराणी निकम, सौ. मधुरिमाराजे, डॉ. शरद बनसोडे, डॉ. विशाल धापटे, रमेश तनवाणी, दिगंबर मोहिते, एस. व्ही. सूर्यवंशी, आर. डी. पाटील, ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहा. व्यवस्थापक अमित डिकर यांच्यासह खेळाडू. 2) उद्घाटनापूर्वी स्पर्धेत सहभागी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्सपटू मुलींनी क्रीडाज्योत मैदानातून अशी फिरवली.   (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

खेळात लढाऊ वृत्तीसह आनंद महत्त्वाचा : महापौर रूपाराणी निकम

‘पुढारी राईज अप’ महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेस प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : खेळाच्या मैदानात केवळ जिंकणे महत्त्वाचे नसते, तर त्यातून मिळणारा आनंद आणि निर्माण होणारी लढाऊ वृत्ती आयुष्याच्या खडतर वाटचालीसाठी मोलाची ठरते. खेळ स्पर्धकांना जीवनातील आव्हानांचा सामना करायला शिकवतात. जो पडतो किंवा हारतो, तोच जिद्दीने पुढे जाऊन विजय मिळवतो, असे प्रेरणादायी मार्गदर्शन स्वत: एक अ‍ॅथलेटिक्सपटू असणार्‍या नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी केले.

‘पुढारी राईज अप’ महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवारी महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ऑक्सिरीचचे रमेश तनवानी, धापटेज क्लिनिकचे डॉ. विशालकुमार धापटे, चितळे डेअरीचे दिगंबर मोहिते, शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एस. व्ही. सूर्यवंशी व आर. डी. पाटील, अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे प्रा. प्रकुल मांगोरे-पाटील आदी उपस्थित होते. सर्वांचे स्वागत दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहायक समूह सरव्यवस्थापक अमित डिकर यांनी केले.

नैसर्गिक आहारावर भर द्या : मधुरिमाराजे

बास्केटबॉलपटू राहिलेल्या मधुरिमाराजे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना, मुलींना राज्य-राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘पुढारी राईज अप’सारख्या स्पर्धा सातत्याने आयोजित होणे आवश्यक आहे. खेळाडूंनी व्यायाम आणि सरावात सातत्य ठेवावे. आहारही समतोल असावा. प्रथिनांसाठी (प्रोटिन) आर्टिफिशियल पावडर टाळून नैसर्गिक पदार्थांवर भर द्यावा. आहारात भाज्या, केळी, अंडी, हरभरा अशा पदार्थांचा समावेश करावा. तसेच बटाटा आणि रताळी यांसारख्या पदार्थांतून ‘कार्ब लोडिंग’ करावे.

दै. ‘पुढारी’चे लोकाभिमुख उपक्रम

समाजोपयोगी लोकाभिमुख उपक्रम हाती घेण्याची परंपरा गेल्या तीन पिढ्या अखंड राखली आहे. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रासाठी केलेले कार्य खेळाडू घडविण्याच्या चळवळीस भक्कम पाठबळ देणारे ठरत असल्याचे रमेश तनवाणी यांनी सांगितले.

सरावासाठी मैदाने उपलब्ध करावीत

क्रीडानगरी कोल्हापुरात हजारो खेळाडू शेकडो खेळांच्या माध्यमातून राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. या खेळाडूंना अत्याधुनिक सोयी-सुविधांबरोबरच सरावासाठी मैदाने कमी पडत आहेत. खेळाडू असणार्‍या महापौर रूपाराणी निकम यांनी शहर व उपनगरातील मैदाने खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शिवाजी विद्यापीठाप्रमाणेच शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सिंथेटिक ट्रॅकच्या निर्मिती शासनाने करावी, अशी मागणी मधुरिमाराजे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT