कोल्हापूर : देशात धार्मिक पर्यटनाला मिळत असलेले महत्त्व आणि अयोध्या, वाराणसीसारख्या तीर्थक्षेत्रांच्या विकासामुळे वाढलेली पर्यटकांची संख्या लक्षात घेता, त्याच धर्तीवर करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरामुळे कोल्हापूरलाही एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
दैनिक ‘पुढारी’ आयोजित, गगन टूसर्र् प्रस्तुत, पॉवर्ड बाय ‘अ हेवन हॉलिडेज’ ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन’चे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ‘गगन टूर्स’च्या संचालिका नंदिनी खुपेरकर, ‘अ हेवन हॉलिडेज’चे संचालक राजेंद्र बुगडे, दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, ‘अ हेवन हॉलिडेज’च्या संचालिका वर्षा बुगडे, सहसंचालिका प्रणिता बुगडे, ‘केसरी टूर्स’च्या संगीता पाटील, ‘कोल्हापूर जिल्हा टूसर्र् ऑपरेटर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सूरज नाईक आणि ‘गगन टूर्स’चे मार्केटिंग हेड योगेश सोनटक्के आदी उपस्थित होते.
पर्यटनक्षेत्राच्या वाढत्या महत्त्वावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेतील या क्षेत्राचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, आज जगभरात आणि देशात पर्यटन क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. या क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होत असून, देशाच्या जीडीपीमध्ये मोठी भर पडत आहे. अयोध्या आणि वाराणसीचा विकास झाल्यानंतर तेथील पर्यटनात 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवाल आहेत. कोल्हापूरलाही तीर्थक्षेत्र म्हणून वेगाने विकसित केल्यास शहरात येणार्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि विकासाला मोठी चालना मिळेल. त्या द़ृष्टीने राज्य सरकार काम करत आहे. उद्घाटनानंतर मंत्री मुश्रीफ यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन पर्यटन कंपन्यांच्या विविध टूर पॅकेजेस्ची माहिती घेतली आणि आयोजकांशी संवाद साधला.
पर्यटनक्षेत्रात काम करणार्या कंपन्यांना दैनिक ‘पुढारी’ गेल्या अनेक वर्षांपासून एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. यातून कोल्हापुरात मोठी आर्थिक उलाढाल आणि रोजगार निर्मिती होत असल्याबद्दल मुश्रीफ यांनी ‘पुढारी’ समूहाचे कौतुक केले. ते म्हणाले, या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. केडीसीसी बँकेच्या संचालकांच्या परदेश दौर्यावेळी आम्ही विविध कंपन्यांकडून कोटेशन मागवले होते, त्यावेळी या क्षेत्रातील स्पर्धा आमच्या लक्षात आली. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार सेवा देणार्या कंपन्यांना पर्यटन व्यवसायात मोठा वाव आहे.