पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमानसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित 13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून होणार आहे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र राज्याचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हेही या चर्चेत सहभागी होणार आहेत. द फर्न हॉटेल, कोल्हापूर येथे हे विकास समिट होत असून, त्याचे थेट प्रक्षेपण पुढारी न्यूज चॅनेलवरुन होईल. या पार्श्वभूमीवर जाणून घेवूया आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र या योजनेबाबत डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केलेल्या सूचना...
प्रत्येक गरजू व गरीब रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. उपचारासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळे कुणीही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये. अशा नागरिकांना आयुष्मान भारत योजना संजीवनी आहे. या योजनेचे काम राष्ट्र कार्याच्या भावनेने करून मिशन यशस्वी करावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्या आहेत.
आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी प्रत्येक वार्डात सीएससी केंद्राच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. नागरिकांना आपल्याला या योजनेचा लाभ कुठल्या रुग्णालयात मिळणार आहे, याची माहिती असावी. प्रत्येक प्रभागात यादी ठळक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावी. गर्दीच्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी शिबिर लावावे. मुंबईत नागरिकांमध्ये आयुष्मान भारत कार्ड विषयी जनजागृती करावी. त्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. जास्तीत जास्त कार्ड काढून प्रत्येकाला वार्षिक ५ लाख रुपयांच्या उपचाराचा लाभ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयांची संख्या वाढविण्यात येणार आहे. याबाबतची कारवाई करण्यात येत आहे. मुंबईमध्ये संपूर्ण देशातून लोक उपचार करण्यासाठी येतात. त्यांना या योजनांचा लाभ मिळतो. मात्र मुंबईकर या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास येते. मुंबईकरांच्या रुग्ण सेवेसाठी या राष्ट्रकार्यात सर्व यंत्रणांनी आपला सहभाग द्यावा. नागरिकांनीसुद्धा स्वतः सक्रिय सहभाग घेत आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले आहे.
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये स्वस्त धान्य दुकान हा महत्त्वाचा घटक आहे. पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून आयुष्मान भारत कार्ड काढण्याची कार्यवाही करावी. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांवरील आजारांवरील उपचारांमध्ये वाढ करायची आहे. या कार्यक्रमांतर्गतसुद्धा रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावी. लोकप्रतिनिधी यांनी योजनेची अंमलबजावणी, पॅनलवरील रुग्णालयांची संख्या, रुग्णांच्या तक्रारी याबाबत सूचनाही डॉ. ओमप्रकशा शेटे यांनी केल्या आहेत.