कोल्हापूर : नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर सुरू असलेल्या ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2024’चा तिसरा दिवस खरेदी, खाद्यपदार्थ, आणि मनोरंजनाचा अनोखा संगम ठरला. प्रचंड गर्दीने गजबजलेल्या या कार्निव्हलमध्ये सन मराठी वाहिनीच्या कलाकारांच्या उपस्थितीने शनिवारी (दि. 28) ग्लॅमरची भर पडली, तर सहस्त्रम बँडच्या रॉक बीट्सने प्रेक्षकांना ठेका धरायला लावले.
रंगीबिरंगी रोषणाईत सजलेल्या ग्राऊंडवर सेल्फी काढणार्या तरुणाईने आणि रील तयार करणार्या सोशल मीडिया उत्साहींनी वातावरण आणखी रंगतदार बनवले. खरेदी, खाद्य आणि आनंदोत्सव अनुभवण्यासाठी कोल्हापूरकरांनी आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळीसह मोठ्या संख्येने हजेरी लावली. मेरी वेदर ग्राऊंडवर उभारलेल्या भव्य मंडपात 130 हून अधिक स्टॉल्सवर गारमेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, आयुर्वेदिक उत्पादने, मसाले, लोणची, चहा, आणि गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसली. अॅम्युझमेंट पार्कच्या राईडस्वर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी आनंद घेतला. झुल्यांवरच्या मुलांच्या उत्साहात पालकांचाही सहभाग होता.
खाद्यप्रेमींसाठी येथे बांबू बिर्याणी, बाजरीची भाकरी, तांबडा-पांढरा रस्सा, मासे, चिकन लॉलीपॉप, चिकन पॉपकॉर्न आणि तंदूरी तसेच शाकाहारींसाठी फास्टफूड, चौपाटी पदार्थ, धपाटे, चायनीज इत्यादी स्वादिष्ट पदार्थांची अक्षरशः रेलचेल आहे. ग्राऊंडच्या मागील बाजूस पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी वाहने बाहेरच्या रस्त्यावर न लावता आतमध्ये पार्किंगमध्ये लावावीत, असे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात येत आहे.
सन मराठीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेतील अभिनेत्री मोनिका राठीने मालिकेच्या शूटिंगमधील अनुभव शेअर करत प्रेक्षकांना मालिकेतील हूक स्टेप करण्याचे चॅलेंज दिले. ‘जुळली गाठ गं’ या येत्या 13 जानेवारीपासून रोज रात्री 8.00 वाजता सुरू होणार्या नव्या मालिकेतील कलाकार पायल मेमाने आणि संकेत चिकटगावकर यांनी त्यांच्या भूमिकांची ओळख करून दिली. ‘कोल्हापूरची भाषा खूपच सुंदर आहे’, असे सांगत पायलने मराठी शिकण्याचा अनुभव शेअर केला. मालिकेतील नायक-नायिकांच्या स्वभावातील संघर्ष प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. ही दोन्ही पात्रे परस्पर विरोधी स्वभावाची आहेत. आजची स्त्री ही परावलंबी नाही. तर ती कर्तृत्ववान आहे. हेही मालिका दाखवते, असे या कलाकारांनी सांगितले.
रविवारी (दि.29) बॉलीवूड म्युझिक मॅशअप हा कार्यक्रम प्रल्हाद-विक्रम आणि सहकारी सादर करणार आहेत.
स्थळ : मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क
वेळ : सकाळी 11 ते रात्री 9:00
दिनांक : 26 ते 30 डिसेंबर 2024
संपर्क : 9834433274