कोल्हापूर : दैनंदिन धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा, निसर्गाच्या सान्निध्यात जिवाभावाच्या मैत्रिणींसोबत धमाल करता यावी, यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे खास सभासदांसाठी आगळ्यावेगळ्या हुरडा पार्टीचे आयोजन केले आहे. ही हुरडा पार्टी मंगळवारी (दि. 23) आळते येथील संस्कृती कृषी पर्यटन केंद्रात होणार आहे. नयनरम्य वातावरणात अस्सल गावरान चवीचा आस्वाद घेत आनंद, करमणूक आणि धमाल अनुभवण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.
या हुरडा पार्टीमध्ये बैलगाडी सवारी, मिनी ट्रॅक्टर राईड, रेन डान्स, जादूचे खेळ, मनोरंजनात्मक गेम्स, स्विमिंग आदी उपक्रमांचा समावेश आहे. तसेच पोत्यात पाय घालून पळणे, रस्सीखेच, संगीत खुर्ची यांसारख्या पारंपरिक खेळांमुळे कार्यक्रमात रंगत येणार आहे. याशिवाय तीर्थ रामलिंग दर्शनाचाही लाभ सहभागी महिलांना मिळणार आहे. तसेच चुलीवर भाजलेला अस्सल गावरान हुरडा, विविध चटण्या, गोड शेव, मका कणीस, बोर, उसाचा ताजा रस यांसह पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण यांचा आस्वाद घेता येणार आहे. याशिवाय तीर्थ रामलिंग दर्शनाचाही लाभ सहभागी महिलांना मिळणार आहे.
या खास हुरडा पार्टीसाठी सभासद शुल्क 650 रुपये, तर 3 ते 7 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी 400 रुपये इतके असून येण्या-जाण्याचा खर्च स्वतंत्र राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हुरडाप्रेमींच्या पसंतीस उतरलेला हा उपक्रम यंदाही अनुभवण्यासाठी आताच बुकिंग करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कस्तुरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी अंतिम तारीख 21 डिसेंबर 2025 असून अधिक माहितीसाठी संपर्क ः9423824997, 9923617769.