कोल्हापूरः दै. ‘पुढारी’ आयोजित दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव २०२६ चा पहिला लकी ड्रॉ शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता काढण्यात येणार आहे. नागाळा पार्क येथील रायसन्स ग्रुपच्या क्रिस्टल प्लाझा प्रकल्पात हा सोडत समारंभ पार पडेल. हा लकी ड्रॉ या उपक्रमात सहभागी व्यावसायिकांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
‘पुढारी’च्या वतीने दरवर्षी ग्राहकांसाठी दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवात सहभागी झालेल्या विविध दुकाने आणि व्यापारी आस्थापनांमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन्स देण्यात आली होती. ग्राहकांनी भरून दिलेली ही कुपन्स संकलित करण्यात आली असून, त्यातूनच शनिवारी पहिला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
या पहिल्या सोडतीमधील भाग्यवान विजेत्यांना स्मार्ट टीव्ही, एअर कूलर, इंडक्शन कुकर, मल्टिमीडिया रेडिओ यांसह अनेक आकर्षक सरप्राईज गिफ्टस् जिंकण्याची संधी मिळणार आहे. दसरा-दिवाळीच्या खरेदीसोबतच ग्राहकांना अशा मौल्यवान वस्तू जिंकता येणार असल्याने खरेदीदारांमध्ये या पहिल्या लकी ड्रॉबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.