कोल्हापूर ः दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज (बुधवार, दि. 5) 80 वा वाढदिवस व सहस्रचंद्रदर्शन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. यासाठी पोलिस परेड ग्राऊंडवर जर्मन हँगर उभारण्यात आला असून, सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण शहरभर डॉ. जाधव यांना शुभेच्छा देणारे फलक आणि कमानी उभारण्यात आल्या असून, हा सोहळा लोकोत्सव व्हावा यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज व ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी केले आहे.
डॉ. जाधव यांचा वाढदिवस जनतेच्या वतीने लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक गौरव सत्कार सोहळा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्व पक्षांचे कार्यकर्ते, कोल्हापुरातील तालीम, संस्था, मंडळे, सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या समितीचे कार्यकर्ते सोहळ्याच्या यशस्वितेसाठी झटत आहेत. मंगळवारी सायंकाळी सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर गौरव समितीच्या सदस्यांनी समारंभस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली.
बुधवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार होत आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार होणार आहे. यावेळी ‘सिंहायन’ या डॉ. जाधव यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या सत्कारासाठी पोलिस परेड ग्राऊंडवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित भव्य डोम उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले असून, व्यासपीठाच्या मागे शंभर फुटांची भव्य एलईडी वॉल बसविण्यात आली आहे. यामुळे मंडपात सर्वांना हा सोहळा पाहता येणार आहे. त्याचबरोबर मंडपाच्या चारही कोपर्यांत चार एलईडी स्क्रीन बसविण्यात आले आहेत.
डॉ. प्रतापसिंह जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी व कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण शहरभर विविध पक्ष, सामाजिक संघटना, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य फलक उभारण्यात आले आहेत.या सोहळ्यासाठी महासैनिक दरबार हॉल, तसेच त्या समोरील जागा पार्किंगसाठी राखून ठेवण्यात आली आहे. महासैनिक दरबार हॉल येथे वाहने पार्क करून तेथून थेट पोलिस परेड ग्राऊंडवर जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला आहे. येथून कार्यक्रमाला येणार्या सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर महासैनिक दरबार हॉलसमोरील रिकाम्या जागेत वाहने पार्क केल्यानंतर संबंधितांना समारंभस्थळी जाण्यासाठी दोन वातानुकूलित बसेसची खास व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसमधून थेट समारंभस्थळी जाता येणार आहे. जाधव कुटुंबीय व नातेवाईकांसाठी पोलिस उद्यानाजवळील (पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर) पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाचा नियोजित कार्यक्रम असल्यामुळे सहस्रचंद्रदर्शन सोहळा वेळेवर सुरू होणार आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन नागरी गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सोहळ्यासाठी अतिमहत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासाठी हार-तुरे, बुके, भेटवस्तू आदी आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सोहळा वेळेत सुरू होणार असल्याने डॉ. प्रतापसिंह जाधव हे सोहळ्याआधी अथवा नंतर कोणाला भेटू शकणार नाहीत. नागरी सत्कार समिती व जनतेच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा एकच सत्कार केला जाणार आहे याची नोंद घ्यावी, असे आवाहन नागरी सत्कार सोहळा समितीने केले आहे.