कोल्हापूर : नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर सुरू असलेला ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल’ रविवारच्या सुट्टीमुळे खरेदीचा ‘सुपर संडे’ ठरला. यावेळी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
महोत्सवातील 130 हून अधिक स्टॉल्सवर फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित ब्रँड्सनी ग्राहकांना आकर्षित केले आहे. ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ पॉवर्ड बाय आणि ‘वारणा आईस्क्रीम’ असोसिएटेड स्पॉन्सर असलेल्या या कार्निव्हलचे लकी फर्निचर हे फर्निचर पार्टनर आहेत. प्रदर्शनात घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. खाद्यप्रेमींनी विविध शाकाहारी- मांसाहारी डिशेसचा आस्वाद घेतला. स्टॉल्सवर फर्निचर, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
रविवार सुट्टीचे निमित्त साधून अनेकांनी सहकुटुंब कार्निव्हलला भेट देऊन खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळी सांगीतिक कार्यक्रमाने महोत्सवाची रंगत वाढवली. विक्रम आणि प्रल्हाद प्रस्तूत धमाल मस्ती लाईव्ह रॉकींग या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
समारोपास होणार ग्लॅमरचा स्पर्श
सोमवारी (दि. 29) होणार्या समारोप समारंभास ‘ग्लॅमर’चा स्पर्श लाभणार आहे. ‘पुढारी कार्निव्हल’च्या सांगता समारंभाला यावर्षी चित्रपटसृष्टीतील तारकांची उपस्थिती लाभणार आहे. झी स्टुडिओज आणि केदार शिंदे दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई ’ची संपूर्ण टीम सायंकाळी 6 नंतर कार्निव्हलला भेट देणार आहे. दिग्गज अभिनेत्री निर्मिती सावंत आणि ग्लॅमरस प्रार्थना बेहरे ही सासू-सुनेची जोडी तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे कोल्हापूरकरांशी थेट संवाद साधणार आहेत. झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, सना शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.