कोल्हापूर : दै. 'पुढारी' आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे ‘डॉक्टर डे’निमित्त आयोजित ‘दीर्घ आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना डॉ. हेमंत जोशी. दुसऱ्या छायाचित्रात व्याख्यानाला झालेली गर्दी.   (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | आजच जीवनशैली बदला अन् १०० वर्षे जगा

ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ आणि जीवनशैलीतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी दिली गुरुकिल्ली; दैनिक 'पुढारी' आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे आयोजित व्याख्यानमाला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार जीवनशैलीमुळे होतात आणि हे याच पिढीने कमावलेले आहेत. जमिनीशी जोडलेली, निसर्गाशी एकरूप होणारी जीवनशैली आजच स्वीकारा, भूक लागली तरच खा, अर्धपोटी राहा, व्यायाम करा, सैल कपडे वापरा आणि साधा, संतुलित आहार घ्या आणि शंभर वर्षे जगा अशी दीर्घ आरोग्याची गुरुकिल्ली ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ आणि जीवनशैलीतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी दिली.

दैनिक 'पुढारी' आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डेनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत डॉ. जोशी बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. वैशाली गायकवाड, दै. 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप पाटील यावेळी उपस्थित होते. डॉ. जोशी म्हणाले नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार भारतामध्ये दोनपैकी एका व्यक्तीला रक्तदाब असून हेच भारतातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. दुर्दैवाने हा साप आपल्या सर्वांच्या घरात घुसला आहे, याची आपल्याला कल्पनाच नाही, असे ते म्हणाले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचा प्रश्न आज मोठा होत आहे. दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित व्याख्यानमाला आरोग्य जागृतीचे महत्त्वाचे काम अखंड पणे करत आहे. असेच काम मानसिक आरोग्यावर होण्याची गरज आहे. डॉ. सदीप पाटील प्रास्ताविकात म्हणाले, अशाप्रकारची एकही व्याख्यानमाला महाराष्ट्रात नाही. लोककल्याणाचे हे काम करणारे दै. 'पुढारी' खऱ्याअर्थाने लोकविद्यापीठ आहे.

भूक नसताना खाणे आजारांना निमंत्रण

गरज नसताना खाणे आणि व्यायामाच्या अभाव यामुळे जास्त साखर चरबीच्या स्वरुपात साठते आणि पोटाचा घेर वाढायला सुरुवात होते. ही चरबी नंतर रक्तातून शरीरभर फिरते. यामुळे रक्तदाब वाढतो. ही चरबी रक्त वाहिन्यांना इजा पोहोचवते. रक्त जिथे जिथे जाते त्या सर्व अवयवांना नुकसान होते, असे सांगून डॉ. जोशी म्हणाले, दररोजचा अर्धा कप चहा अधिक प्यायला, तर दर महिन्याला पाव किलो वजन वाढते. आणि अर्धा किलो वजन वाढले की, रक्तदाब १ ने वाढतो. त्यामुळे भूक लागली तरच खा आणि अर्धे पोट रिकामे ठेवा. जमिनीशी, निसर्गाशी, ऋतूंना अनुकूल राहणीमान ठेवणे हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

तोंडाला कुलूप हाच घसरणीवरचा ब्रेक

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी शंभरपैकी दोन माणसेदेखील लठ्ठ नव्हती. आता १०० पैकी ५० लोकांना हा विकार आहे. 'लॅन्सेट'मध्ये प्रसिद्ध अभ्यासानुसार १५० पैकी १४४ लोकांना औषधे देऊनसुद्धा मधुमेह आणि रक्तदाब हे आजार वाढतच राहिल्याचे लक्षात आले; मात्र नियंत्रित आहार व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलामुळे ९० टक्के लोकांच्या आजाराची पातळी कमी झाली. पोट सुटायला लागले की, आरोग्याची गाडी घसरणीला लागली आहे हे समजावे. या गाडीचा ब्रेक म्हणजे तोंडावर नियंत्रण आहे. ते नियंत्रण ठेवले की, गाडी वेगाने खाली जात नाही, असे डॉ. जोशी म्हणाले.

...तर तुम्ही मरण्याच्याच लायकीचे

कुत्रा चावला की रेबिज होतो. यासाठी कुत्रा मागे लागला की, आपल्याला कुत्र्यापेक्षा जास्त धावता आले पाहिजे. तुम्ही धावू शकत नसाल, तर तुम्ही मरायच्याच लायकीचे, असे डॉ. जोशी यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. ते म्हणाले, शक्य होईल तेवढे धावत राहा. बैठे काम असले तरी बसू नका, उभे राहून काम करा. ते तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. बेडवर झोपण्यापेक्षा जमिनीवर झोपा, असेही त्यांनी सांगितले.

असे असावे जेवणाचे ताट

जेवणाच्या ताटाचे चार भाग करा. दोन भाग फळे, भाज्या, कोशिंबीर, एक भाग डाळ किंवा मांस (प्रोटीन), एक भाग भात किंवा पोळी, जर तुमचा पोटाचा घेर वाढला असेल, तर भात आणि पोळी नाही खाल्ली तरी हरकत नाही. मी २०१७ पासून पोळी किंवा भात खाल्ला नाही. नाही खाल्ल्याने काही फरक पडत नाही.

जे शेतात काम करत होते ते कोरोनात वाचले

कोरोनामध्ये ज्यांना शेतात काम करण्याची सवय होती ते वाचले. कारण, त्यांना सूर्यप्रकाश मिळत होता. त्यांच्या शरीरात अधिकची चरबी नव्हती. त्यामुळे त्यांची रोग प्रतिकार क्षमता चांगली होती. ड जीवनसत्त्व सूर्यप्रकाशात मिळते. त्यामुळे सर्व ऋतूत ९० टक्के अंग झाकणारे कपडे घातल्याने भारतात ड जीवनसत्त्वाची कमतरता ही खूप मोठी समस्या आहे. घट्ट कपड्यांमुळे शरीराचे तापमान अनावश्यक वाढते. त्यामुळे शरीर थकते. कष्टामुळे शरीर थकत नाही, तर उष्णतेमुळे थकते. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी कोपरापर्यंतचा शर्ट आणि हाफ पॅंट हा बाहेर आणि घरात लुंगी आणि बनियन असा पेहराव स्वीकारला. चुकीच्या पद्धतीच्या कपड्यांमुळे भारतातील मुलांना जीवनसत्त्व मिळत नाहीत. हाडांची वाढ होत नाही. त्यामुळे ती बुटकी होत आहेत.

लठ्ठपणा सात तोंडांचा राक्षस

जास्त खाणे आणि जास्त बसणे, यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा हा सात तोंडाचा राक्षस असून त्यामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, मेंदू विकार, श्वासननलिकेचे, फुफ्फुसाचे आजार होतात. त्याचबरोबर कॅन्सरचा धोका,देखील वाढतो. ही जीवनशैली थांबवून नैसर्गिक जीवन स्वीकारणे हाच निरोगी दीर्घायुष्याचा मंत्र आहे, असे जोशी म्हणाले.

दै. 'पुढारी'शी २२ वर्षांपासूनचा ऋणानुबंध

यावेळी डॉ. जोशी यांना दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 'सिंहायन' या आत्मचरित्रात्मक ग्रंथाची प्रत दै. 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांच्या हस्ते भेट देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मोहन हवालदार उपस्थित होते. गेल्या २२ वर्षांपासून जेव्हा कोल्हापुरात येतो तेव्हा देवीचे दर्शन घेणे आणि 'पुढारी' कार्यालयाला भेट देणे हा आपला शिरस्ता असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

बाळंतपण आणि लहान मुलांची काळजी

निसर्गाच्या नियमानुसार बाळंतपण हे बसून किंवा उभे राहून व्हायला हवे. आडवे झोपून बाळंतपण केल्यास अडचणी येतात. जन्मानंतर बाळाला लगेच आईचे दूध पाजाव आणि पहिले २ वर्षे आईचे दूध सुरू ठेवावे. सहा महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबत वरचा घट्ट आहार (शिरा, उपमा, वरण-भात) द्या. पातळ पाजू नये, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

‘सात धान्यांचे’ सूपर फूड

डॉ. जोशी म्हणाले, घरीच पौष्टिक आणि स्वस्त 'सुपर फूड' तयार करा. त्यासाठी १ वाटी जवस, ३ प्रकारची धान्ये ( नाचणी, गहू, सातू ) आणि ३ प्रकारच्या डाळी, मूग, मटकी, मसूर किंवा चणे अशा सात वस्तू एकत्र करून १२ तास पाण्यात भिजवाव्यात. त्यानंतर कपड्यात बांधून मोड आल्यानंतर ते उन्हात किंवा सावलीत सुकवून, हलके भाजून पीठ बनवून ठेवावे. हे पीठ लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी अत्यंत पौष्टिक ‘सुपर फूड' आहे.

ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक टाळा

डॉ. जोशी यांनी ॲल्युमिनियम भांड्यांमुळे विषबाधा (स्लो पॉयझिनिंग) होते. त्यामुळे स्वयंपाक घरात अल्युमिनियमची भांडी नको असे सांगितले. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी स्वयंपाक १०० टक्के लोखंडाच्या कढईत करावा असे आवर्जुन सांगितले. प्लास्टिकच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका वाढतो आणि थायरॉईडसारखे आजार होतात. त्यामुळे सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिक कपचा वापर टाळा, असे त्यांनी सांगितले.

पोटाचा घेर आणि ‘लक्ष्मणरेषा’

अतिबसणे आणि अतिखाणे हे सर्व आजारांचे मूळ आहे. मुलांच्या पोटाच्या घेरासाठी वयानुसार मर्यादा निश्चित केली आहे. ३ वर्षांच्या मुलाच्या पोटाचा घेर ५० सेंमीपेक्षा कमी असावा. हा घेर दरवर्षी ३-३ सेंमीने वाढतो. १३ वर्षांनंतर आणि प्रौढांसाठी पोटाच्या घेराची लक्ष्मण रेषा ८० सेंमी (३२ इंच) आहे. त्यामुळे वारंवार टेपने पोटाचा घेर मोजा, असा सल्लाही डॉ. हेमंत जोशी यांनी दिला.

आरोग्यदायी टिप्स

भूक लागल्यावरच खावे, भूक नसेल तर खाणे टाळा.

अर्धपोटी राहावे, जेवढ्या भुकेची गरज आहे, त्याच्या अर्धा भागच खा.

जेवणामध्ये भाजी, कोशिंबीर, पोळी, भात असावा.

कंबर ३२ इंच किंवा ८० सेंमीपेक्षा जास्त असेल, तर भात, गोड पदार्थ बंद करा.

डोळ्यांवर, नाकावर पाणी मारा. गुळण्या करा. जंतू संसर्ग टळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT