गुंतवणुकीत सातत्य, शिस्तच देणार यश 
कोल्हापूर

गुंतवणुकीत सातत्य, शिस्तच देणार यश

दै. ‘पुढारी’ आणि ‘आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड’ आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गेल्या तीन दशकांत शेअर बाजाराचा निर्देशांक 8 हजारांवरून 85 हजारांवर पोहोचला. या प्रवासात युद्धे झाली, नैसर्गिक आपत्ती आल्या आणि जागतिक मंदीचे सावटही आले; परंतु भारतीय बाजारपेठ वाढतच राहिली. यापुढेही बाजार वाढतच राहणार आहे, त्यामुळे चढ-उतारांची भीती न बाळगता गुंतवणुकीत सातत्य ठेवणे हेच आपल्या हाती आहे आणि तेवढे आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे,’ असे प्रतिपादन गुंतवणूक तज्ज्ञांनी केले.

दैनिक ‘पुढारी’ आणि ‘आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड’ यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित ‘म्युच्युअल फंड आणि आर्थिक साक्षरता’ चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडस्चे झोनल स्पीकर अभिजित देशमाने, वसंत कुलकर्णी, सुमित मुदगी आणि प्रसाद धर्माधिकारी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक ऑपरेशन्स राजेंद्र मांडवकर, आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसीचे सुभाषित रॉय आदी उपस्थित होते.

‘पुढील 20 वर्षांत भारत 20 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत आहे. या काळात बाजार स्थिर राहणार नाही, तो वर-खाली होत राहील. शिस्त आणि सातत्य हे दोनच मंत्र सामान्य गुंतवणूकदाराला श्रीमंत करू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले. कुलकर्णी म्हणाले, मुलांच्या शिक्षणासाठी बँका कर्ज देतात, पण निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी कोणीही कर्ज देत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या आर्थिक स्वातंत्र्याशी तडजोड न करता निवृत्तीच्या नियोजनाला प्राधान्य द्यावे. तसेच, म्युच्युअल फंडात ‘कॅल्क्युलेटिव्ह रिस्क’ घेऊन गुंतवणुकीचे लक्ष्य गाठावे. प्रसाद धर्माधिकारी म्हणाले, ‘गुंतवणूक करताना घाई न करता ती दीर्घकालीन उद्दिष्टांशी जोडणे आवश्यक आहे. जेव्हा मार्केट खाली येते, तेव्हा पॅनिक न होता अधिक गुंतवणूक करावी, कारण हीच वेळ भविष्यातील मोठ्या परताव्याची पायाभरणी असते.’

गुंतवणूक सल्लागार सुमित मुदगी म्हणाले, ‘जास्त परताव्याचे आमिष दाखवणार्‍या बोगस योजनांपासून सावध राहा. जेवढा जास्त परतावा, तेवढा अधिक धोका असतो. तुमची मुद्दल सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे असून परतावा हे केवळ ‘बाय प्रॉडक्ट’आहे. गुंतवणूक करताना केवळ सेबी (SEBI) किंवा ‘अ‍ॅम्फी’ (AMFI) मान्यताप्राप्त वितरकांमार्फतच करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी केले. या चर्चासत्राला कोल्हापूर आणि परिसरातील गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रश्नोत्तराच्या तासात गुंतवणूकदारांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT