कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत ॲग्रीस्टॅक नसणारे, मयत खातेदारांच्या वारसांना, देवस्थान जमीन, संमती कर्जवाटप अशा शेतकर्यांनाही कर्जमाफी मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्येही यासंदर्भात मागणी केली असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पात्र शेतकर्यांना कर्जमाफी लाभ वितरणचा ऑनलाईन समारंभ झाला. या समारंभाला मंत्री मुश्रीफ यांनीही ऑनलाईन उपस्थिती लावली. दरम्यान, त्यांनी ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही त्यांनी कुटुंबातील शेतजमीन नावावर असलेल्यांच्या संमतीने पीक कर्जाची उचल केली आहे. काही शेतकर्यांनी देवस्थानच्या जमिनीवर पीककर्ज घेतले आहे. वडील मयत झाल्यानंतर वारसांच्या नावावर शेतजमीन झालेली नाही, अशा शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अडचण येत आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या ११,१९८ शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे ७४ कोटी रुपये जमा झाले. १५,७८३ शेतकर्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले. यापैकी ४,५८५ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच त्यांच्याही बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
आधार प्रमाणिकरण तातडीने पूर्ण करा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २९,४२९ शेतकर्यांची माहिती अपलोड केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात २३,१३१ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. पात्र शेतकर्यांपैकी १५,७८३ शेतकर्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले. ७३४८ शेतकर्यांनी अद्याप प्रमाणिकरण केलेले नाही. त्यांनी तातडीने आधार प्रमाणिकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.