प्रोटॉन थेरपी उपचार कक्ष उपकरण.  (संग्रहित फोटो)
कोल्हापूर

Cancer Treatment Proton Therapy | कॅन्सरवर उपचारासाठी सीपीआरमध्ये ‘प्रोटॉन थेरपी’!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महाराष्ट्रातील पहिले केंद्र ठरणार

पुढारी वृत्तसेवा

एकनाथ नाईक

कोल्हापूर : राज्यात दिवसेंदिवस कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या ( सीपीआर ) शेंडा पार्क येथील प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयात अत्याधुनिक ‘प्रोटॉन थेरपी’ सुरू होणार आहे. ही सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील प्रोटॉन थेरपी उपलब्ध करून देणारे सीपीआर हे राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार आहे.

ही सुविधा सार्वजनिक - खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर किंवा शासनाच्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक उपकरण सहा महिन्यांत सीपीआरच्या शेंडा पार्क येथील कॅन्सर रुग्णालयात दाखल होणार आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष पाठपुरावा सुरू केला आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई येथील शासकीय केंद्रासह काही निवडक ठिकाणीच ही सुविधा आहे. खासगी रुग्णालयांमध्ये प्रोटॉन थेरपीसाठी साधारण सात ते दहा लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे सीपीआरमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सीमाभागातील हजारो कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतातील पहिले सार्वजनिक सरकारी प्रोटॉन थेरपी केंद्र १५ ऑगस्ट २०२३ पासून टाटा मेमोरियल सेंटर येथे सुरू झाले आहे.

मेंदू, प्रोस्टेटसह बालकांमधील कर्करोग रुग्णांना ठरणार प्रभावी

मेंदू, प्रोस्टेट, डोळ्यांनजीकसह बालकांमधील कर्करोग तसेच शरीरातील अत्यंत संवेदनशील भागांतील गाठींवर प्रोटॉन थेरपी विशेष प्रभावी ठरते. वाढत्या वयातील मुलांमध्ये निरोगी ऊतींचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने बालकांच्या कर्करोग उपचारात या पद्धतीला विशेष प्राधान्य दिले जाते.

प्रोटॉन थेरपी म्हणजे काय?

प्रोटॉन थेरपी ही कर्करोगावरील अत्याधुनिक किरणोपचार (रेडिएशन) पद्धत आहे. पारंपरिक एक्स रे किरणांऐवजी प्रोटॉन कणांचा वापर करून कर्करोगाच्या गाठीवर अत्यंत अचूकपणे किरणोत्सर्ग केला जातो. प्रोटॉन किरणे गाठीवरच त्यांची जास्तीत जास्त ऊर्जा सोडत असल्याने आजूबाजूच्या निरोगी ऊती (हेल्दी टिश्यूज) आणि अवयवांना कमी हानी पोहचवितात. त्यामुळे उपचारांचे दुष्परिणामही तुलनेने कमी होतात.

किमो आणि रेडिएशन थेरपीपेक्षाही अधिक प्रगत मानली जाणारी प्रोटॉन थेरपी कॅन्सर रुग्णांसाठी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आवश्यक जागेची पाहणी पूर्ण झाली असून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच कॅन्सर रुग्णालयात ही थेरपी कार्यान्वित होणार आहे.
डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT